आशिष शेलारांच्या हत्येची सुपारी दिल्याचे सांगून कंट्रोल रुमला कॉल, बॉम्बस्फोटातील माफीच्या साक्षीदाराला अटक

आशिष शेलारांच्या हत्येची सुपारी दिल्याचे सांगून कंट्रोल रुमला कॉल, बॉम्बस्फोटातील माफीच्या साक्षीदाराला अटक

मुंबई – भाजपा आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांच्या हत्येची सुपारी दिल्याचा आरोप करुन, एका व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला फोनवरुन माहिती दिल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली होती. मात्र हा कॉल बोगस असल्याचे उघडकीस येताच मुंबई बॉम्बस्फोटातील एक आरोपी आणि माफीचा साक्षीदार असलेल्या मंजुर अहमद मेहमूद कुरेशी याला निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला वांद्रे येथील लोकल कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सावत्र भावांनी दारुसाठी पैसे दिले नाही म्हणून त्यांना अडकविण्यासाठीच त्याने मुख्य नियंत्रण कक्षाला कॉल केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बुधवारी रात्री नऊ वाजता एका अज्ञात व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला कॉल केला होता. या व्यक्तीने त्याला आमदार आशिष शेलार यांची हत्येची सुपारी देण्यात आली असून त्याला पोलीस मदतीची गरज आहे असे सांगितले होते. या घटनेची संबंधित पोलिसांनी गंभीर दखल घेत निर्मलनगर पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते. रात्री उशिरा पोलिसांनी मंजुर कुरेशीला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्याने मद्यप्राशन केले होते.

कोण आहे मंजुर कुरेशी?
मंजुर हा वांद्रे परिसरात राहत असून सध्या रिक्षाचालक म्हणून काम करतो. १९९३ साली मुंबई शहरात झालेल्या बॉम्बस्फोट (1993 Bomb Blast Case) कटातील तो आरोपी असून त्याला पोलिसांनी अटक केली होती. या गुन्ह्यांत तो नंतर माफीचा साक्षीदार झाला होता. त्यामुळे नंतर त्याची सुटका झाली होती. परवेज कुरेशी आणि जावेद कुरेशी हे त्याचे सावत्र भाऊ असून बुधवारी दुपारी त्याने त्यांच्याकडे दारुसाठी पैसे मागितले होते. मात्र या दोघांनीही त्याला दारुसाठी पैसे देण्यास नकार दिला होता. त्याचा त्याला प्रचंड राग आला होता. त्यातून त्याने या दोघांनाही बघून घेण्याची धमकी दिली होती. रात्री मंजुरने मद्यप्राशन केले. दारुच्या नशेत त्याने मुख्य नियंत्रण कक्षाला फोन करुन परवेज आणि जावेद यांनी त्याला आशिष शेलारच्या हत्येची सुपारी दिल्याचा खोटा आरोप केला. या आरोपानंतर या दोघांना पोलीस पकडतील, त्यांची चौकशी करतील. या चौकशीचा त्यांना त्रास होईल असे त्याला वाटत होते. मात्र त्याच्या अटकेने या घटनेमागील कारणाचा खुलासा झाला. त्यानंतर त्याच्याविरुद्ध निर्मलनगर पोलिसांनी गुन्हा नोंदवून नंतर त्याला अटक केली. अटकेनंतर गुरुवारी दुपारी त्याला वांद्रे येथील महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

First Published on: March 2, 2023 11:05 PM
Exit mobile version