अत्तर, डिओड्रंटसह पुठ्ठयांचे बॉक्स क्रॉफर्ड मार्केटच्या आगीला कारणीभूत

अत्तर, डिओड्रंटसह पुठ्ठयांचे बॉक्स क्रॉफर्ड मार्केटच्या आगीला कारणीभूत

अत्तर, डिओड्रंटसह पुठ्ठयांचे बॉक्स क्रॉफर्ड मार्केटच्या आगीला कारणीभूत

महात्मा ज्येातिबा फुले मंडई अर्थात क्राफर्ड मार्केटमध्ये गुरूवारी लागलेल्या भीषण आगीला येथील अस्ताव्यस्त ठेवलेले पुठ्ठ्यांचे बॉक्स, अत्तर आणि डिओड्रंटच्या बॉटल्सच कारणीभूत ठरल्याची बाब समोर येत आहे. पुठ्ठ्यांमुळे आग पसरली तसेच अत्तर आणि डिओड्रंटमुळे आग भडकल्याचे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. दरम्यान पुठ्ठ्यांच्या बॉक्सना मंडईमध्ये बंदी घालण्याची मागणी होत आहे.

सध्या क्रॉफर्ड मार्केटमधील सर्व दुकाने लॉकडाउनमुळे बंद आहेत. गुरुवारी संध्याकाळी सव्वा सहा सुमारास मंडईमध्ये भीषण आग लागली. या आगीत मंडईमधील पंधरा ते वीस लहान मोठ्या गाळ्यांमधील बॉक्समध्ये पॅकिंग केलेल्या साहित्याला आग लागली. तळमजला अधिक पोटमाळ्यांवर हे साहित्य ठेवण्यात आले होते. दुकानांमध्ये बांबू तसेच विजेच्या तारांमुळे आग आणखी पसरली.

वस्तू पॅकिंग करण्यासाठी मार्केटच्या आवारात मोठ्या प्रमाणात पुठ्ठ्यांचे बॉक्स ठेवलेले आहेत. तसेच इतर टाकाऊ वस्तू व सामानाने मंडईमधील मोकळी जागा व्यापली आहे. लॉकडाउनमुळे दुकाने बंद असून बॉक्स ठेवण्यास मंडईमध्ये स्वतंत्र आणि मोकळी जागा नाही. त्यामुळे कुठेही हे बॉक्स ठेवलेले आहेत. त्याचा फटका आगीच्या निमित्ताने बसला आहे. अत्तर आणि डिओड्रंटसाठी रसायनांचा वापर केला जातो. आग भडकण्यासाठी हे ही एक कारण असल्याची माहिती अग्निशमन दलातील सूत्रांनी दिली.

पुठ्ठ्यांचे बॉक्स मंडईमधून हटवावे, अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून होत आहे. मंडईमध्ये दररोज हजारो बॉक्स बनवले जातात. सन २०१५ मध्ये लागलेल्या आगीतही पुठ्ठ्यांच्या बॉक्समुळे आग भडकली होती. त्यामुळे हे बॉक्स बाहेरच्या गोदामात तयार करून मार्केटमध्ये आणावेत, अशी मागणी येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक गणेश सानप यांनी केली आहे. मार्केटच्या सुरक्षेबाबत लवकरच पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.

क्रॉफर्ड मार्केटच्या आग प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून तीन ते चार दिवसात या आगीचा अहवाल पालिकेला सादर करण्यात येईल. – प्रभात रहांगदळे,  उपायुक्त व प्रमुख अग्निशमन अधिकारी

First Published on: June 12, 2020 11:15 PM
Exit mobile version