पश्चिम रेल्वेच्या स्थानकावर सीसीटीव्हीची नजर

पश्चिम रेल्वेच्या स्थानकावर सीसीटीव्हीची नजर

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. रेल्वे स्थानकावर एखादा गुन्हा घडल्यास तो सीसीटीव्हीमध्ये कैद होतो. यामुळे गुन्ह्याचा तपास करताना या सीसीटीव्हीतील फुटेज पाहून तपासाला सुरुवात होते. यासाठी रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षितेसाठी रेल्वे स्थानकांवर सीसीटीव्ही बसविणे गरजेचे असते. याचाच विचार करुन आता पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकावर अतिरिक्त १ हजार ७३५ सीसीटीव्ही बसवण्यास रेल्वे बोर्डानी मंजुरी दिली आहे. तर उपनगरीय स्थानकांमध्ये २ हजार ८१५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. यामुळे एकात्मिक सुरक्षेंतर्गत या मार्गावरील सर्व उपनगरी स्थानके सीसीटीव्हींच्या कक्षेत येणार आहेत. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने यापूर्वीच्या तुलनेत आणखी १ हजार ७३५ कॅमेऱ्यांची भर पडेल, अशी माहिती रेल्वे सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे.

देशभरातील रेल्वे स्थानकात एकात्मिक सुरक्षेंतर्गत विविध सुरक्षा उपाय केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून प्रथम मध्य रेल्वेच्या स्थानकातही नवीन सुरक्षा साधने बसवतानाच सीसीटीव्हींचाही समावेश केला होता. आता पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय स्थानकांवरही याच सुरक्षा यंत्रणेमार्फत २ हजार ८१५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. सध्या १ हजार ०८० कॅमेरे पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर लागलेले आहेत. हे कॅमेरे टप्प्याटप्प्यात बदलून त्याऐवजी नवीन कॅमेरे बसविले आहेत. सध्याच्या सीसीटीव्हींची संख्या पाहिल्यास १ हजार ७३५ कॅमेऱ्यांची भर पडणार आहे.

या स्थानकांवर बसविण्यात येणार सीसीटीव्ही

चर्चगेट ते विरारपर्यंत सर्व स्थाकांत सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. तर वैतरणा, सफाळे, केळवे रोड, पालघर, बोईसर, वाणगाव आणि डहाणू रोड स्थानकात सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.

विरार पुढील स्थानकात सीसीटीव्ही नाही

विरार पुढील स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवासी ये – जा करत असतात. मोठ्या संख्येने या ठिकणी प्रवाशांची गर्दी असते. मात्र असे असताना देखील विरार पुढील स्थानकात स्टेशनवर प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. एखाद्या गुन्ह्याचा तपास करताना या स्थानकावर मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. मात्र आता ही अडचण दूर होणार आहे. कारण आता या मार्गावर सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे.


वाचा – कर्जत ते लोणावळा मार्गावर सीसीटीव्हीची नजर


 

First Published on: December 24, 2018 4:13 PM
Exit mobile version