CoronaVirus : आयसीयू बेड्ससाठी केंद्रीय संस्थांना विनंती

CoronaVirus : आयसीयू बेड्ससाठी केंद्रीय संस्थांना विनंती

कोरोनाची साथ नियंत्रित करण्याच्या नियोजनाचा भाग म्हणून अधिकाधिक आयसीयू बेड्स उपलब्ध व्हावेत, यासाठी राज्य सरकारने रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर आणि इतर केंद्र सरकारच्या अखत्यारीतील रुग्णालये तसेच संस्थाना त्यांच्या राज्यभरातील सुविधा उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वत: चर्चा करीत आहेत.

सध्या रुग्णांची संख्या वाढत असून रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाणही वाढते आहे. तथापि केंद्र सरकारने मे महिन्यात कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केल्याने राज्य सरकारने मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये आयसोलेशन आणि आयसीयू बेड्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील याचे नियोजन केले आहे. त्यानुसार मुंबईत  महालक्ष्मी रेसकोर्स, नेहरू सायन्स सेंटर, नेहरू तारांगण, गोरेगाव एक्झिबिशन सेंटर, जेजे रूग्णालयाजवळील रिचर्डसन कुड्रास फॅक्टरीची जागा, वांद्रे कुर्ला संकुल आदी ठिकाणी आयसोलेशन आणि आयसीयू बेड्सची सुविधा निर्माण केली आहे.

तसेच राज्यात इतरत्रही मोठ्या शहरांमध्ये पालिका आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या पातळीवर ही सुविधा उपलब्ध होत आहे. यामध्ये राज्यात खासगी रुग्णालये आणि मोठ्या संस्थांच्या जागाही आयसीयू बेड्ससाठी उपलब्ध होत आहेत.
लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल केल्यानंतर आता राज्याराज्यातून महाराष्ट्रातले नागरिक यायला सुरुवात झाली आहे. तसेच परदेशातूनही नागरिक परतायला सुरुवात होईल. रुग्णसंख्या अधिक वाढल्यास जास्त आयसीयू बेड्सची गरज लागेल तसेच इतर वैद्यकीय सुविधा लागतील.  हे गृहीत धरून राज्य सरकारने भारतीय रेल्वे, मुंबई पोर्ट ट्रस्ट, भारतीय लष्कर, नौदल यांना त्यांच्या रुग्णालयांच्या जागा आणि त्यांच्या अखत्यारीतील इतर मोठ्या इमारती उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती केली आहे.

First Published on: May 6, 2020 6:12 PM
Exit mobile version