सीईटी प्रवेश परीक्षा ३ ऑक्टोबरपासून

सीईटी प्रवेश परीक्षा ३ ऑक्टोबरपासून
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च शिक्षण विभागाच्या विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार सीईटी परीक्षांना ३ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. एमपीएडची परीक्षा ३ ऑक्टोबरला तर विधी ५ वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा ११ ऑक्टोबरला होणार असल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले. 
 
कोरोनामुळे यंदा शैक्षणिक वर्षाचे वेळापत्रक बिघडले. कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने अनेक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा लांबणीवर गेल्या. उच्च शिक्षण विभागाच्या प्रवेश परीक्षांचे सुधारित वेळापत्रक सीईटी सेलने जाहीर केले आहे. त्यानुसार तंत्रशिक्षण विभागाच्या चार, उच्च शिक्षण विभागाच्या आठ सीईटी परीक्षांना ३ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. एमपीएड-एमएड अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ३ ऑक्टोबर, बीएड-एमएड १० ऑक्टोबर, एलएलबी ५ वर्ष अभ्यासक्रमाची परीक्षा ११ ऑक्टोबर, बीपीएड ११, बीए-बीएससी बीएड इंटिग्रेटेड ११ ऑक्टोबरला होणार आहे. राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षा अद्याप झाल्या नसल्याने एलएलबी ३ वर्ष अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. येत्या काही दिवसात या अभ्यासक्रमाच्या परीक्षेची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
 
सीईटी परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे सर्व नियम पाळून काटेकोरपणे घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राची माहिती, रिपोर्टींग टाईम, परीक्षा सुरु होण्याची वेळ हॉल तिकिटावर देण्यात येणार आहे. हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना लवकरच संकेतस्थळावर लिंक देण्यात येईल. परीक्षेची सर्व माहिती संकेतस्थळावर सीईटीकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
First Published on: September 24, 2020 7:53 AM
Exit mobile version