Corona Crisis: करोनामुळे सीईटी सेलचे वेळापत्रक विस्कळीत

Corona Crisis: करोनामुळे सीईटी सेलचे वेळापत्रक विस्कळीत

सीईटीचे वेळापत्रक कोलमडले

राज्य सीईटी कक्षामार्फत १६ सीईटी परीक्षा घेतल्या जातात. त्यापैकी पहिल्या टप्यात एमबीए परीक्षा केवळ पूर्ण झाली आहे. त्यामुळे १५ सीईटीच्या परीक्षा दोन महिन्यात पूर्ण होणार होत्या. मात्र आता सर्वच सीईटी परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. एमसीए, एमएचटी सीईटी नंतर आता एलएलबी पाच वर्षे (इंटीग्रेटेड) १२ एप्रिल रोजी होणारी सीईटी परीक्षा लॉकडाऊनमुळे पुढे ढकलली आहे.

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी २८ मार्चला होणारी एमसीए सीईटी परीक्षा पुढे ढकलली. त्यानंतर देशात १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात १३ ते १७ एप्रिल आणि २० ते २३ एप्रिलदरम्यान होणारी परीक्षा पुढे ढकलली आहे. राज्यातील सर्व परीक्षा आणि विद्यापीठ परीक्षांचे नियोजन तसे अन्य खासगी परीक्षांचे नियोजन पाहून १६ सीईटी परीक्षांचे नियोजन दरवर्षी केले जाते. एमबीए सोडून सर्वच परीक्षा लांबणीवर गेल्याने प्रथम वर्ष व्यावसायिक अभ्यासक्रमाचे वेळापत्रक अक्षरश: कोलमडून पडणार आहे.

जूनपासून सुरु होणारे अभियांत्रिकी, कृषी, एमबीए, विधी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा गोंधळ उडणार आहे. यामुळे २०२०-२१ हे शैक्षणिक वर्ष विस्कळीत होणार हे मात्र निश्चित झाले आहे. सर्व परीक्षांच्या तारखा आणि नियोजन करणे आता सरकारला अवघड जाण्याची शक्यता आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी पुढे गेली आहे. या परीक्षेला यंदा तब्बल ५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्याचबरोबर या परीक्षेला १ लाख ११ हजार ६१३ विद्यार्थ्यांची वाढ झाली आहे. आता प्रत्येक विद्यार्थ्यांचे जिल्हास्तरावर नियोजन नव्याने करावे लागणार आहे. १२ एप्रिलला होणारी एलएलबी पाच वर्षे (इंटीग्रेटेड) सीईटीही पुढे ढकलली आहे. या परीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे २३ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यासंदर्भातील सूचना सीईटी सेलने संकेतस्थळावर दिल्या आहेत.

First Published on: March 26, 2020 7:31 PM
Exit mobile version