भाजप नेते संध्याकाळी राज्यपालांना भेटणार – चंद्रकांत पाटील

भाजप नेते संध्याकाळी राज्यपालांना भेटणार – चंद्रकांत पाटील

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत येण्यापूर्वीच्या महिन्याभरात राज्यपालांची भेट या दोन शब्दांभोवती बरीच समीकरणं विणली जात होती. राज्यपालांचं निवासस्थान तेव्हा सत्तास्थापनेचं जणूकाही केंद्रच झालं होतं. आता पुन्हा एकदा राज्यपालांच्या निवासस्थानाचा विषय निघाला आहे. भाजपचे नेते आणि आमदार राज्यपालांना संध्याकाळी भेटायला जाणार आहेत. त्यासाठी राज्यपालांनी विशेष वेळ देखील दिली आहे. संध्याकाळी ६ वाजता राज्यपालांची भेट घेणार असल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि पुण्याच्या कोथरूड मतदारसंघातले आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. आज दिवसभर भाजपकडून राज्यात अनेक ठिकाणी सरकारच्या शेतकरी कर्जमाफीविषयीच्या धोरणांचा निषेध करण्यासाठी आंदोलन केलं. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

नक्की का भेटणार राज्यपालांना?

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशी विरोधकांनी शेतकरी कर्जमाफी आणि महिला सुरक्षा या मुद्द्यांवरून जोरदार घोषणाबाजी आणि गदारोळ घातला. याच मुद्द्यांवर भाजपकडून राज्यभरात ठिकठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘सोलापूरमधून शाहू महाराजांचे वंशज समरजित राजे यांनी ५२ हजार लोकांची पत्र गोळा केली आहेत. त्यात काही रक्ताने लिहिलेली देखील आहेत. ही पत्र आणि त्यातून करण्यात आलेल्या आम्ही संध्याकाळी ६ वाजता राज्यपालांना भेटून त्यांना देणार आहोत’, असं चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले.

‘…म्हणून सभागृह बंद पाडलं’

दरम्यान, आज विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहांचं कामकाज विरोधकांनी घातलेल्या गोंधळामुळे दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. त्याविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘१५ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर केली. पण सांगतात की ३५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहेत. या वेगाने संपूर्ण कर्जमाफी करायला ४६० महिने लागतील. सरकारकडे पैसे नाहीत, योजना नाहीत. म्हणून विधानसभा कामकाज न होता आम्ही बंद पाडली. मुख्यमंत्री देखील इतक्या संवेदनशील विषयात सभागृहात थांबण्याऐवजी १० मिनिटांत उठून गेले. त्यामुळे आम्ही दिवसभरासाठी सभागृह बंद पाडलं’.


हेही वाचा – विरोधकांची घोषणाबाजी पाहून अजितदादांनाही आठवली ‘पायरी’!
First Published on: February 25, 2020 4:48 PM
Exit mobile version