चेंबूर सामूहिक बलात्कारप्रकरणाची फाईल बंद होणार; पुरावे सापडले नसल्याने निर्णय

चेंबूर सामूहिक बलात्कारप्रकरणाची फाईल बंद होणार; पुरावे सापडले नसल्याने निर्णय

प्रातिनिधिक छायाचित्र

गेल्या वर्षी जुलै महिन्यांत चेंबूर परिसरातील सामूहिक बलात्कारप्रकरणी विशेष तपास पथकाकडून लवकरच सी समरी फाईल केली जाणार आहे. या गुन्ह्यांचा तपासादरम्यान पोलिसांना सामूहिक बलात्कार झाल्याचे काहीच पुरावे सापडले नाही, तसेच एका संशयिताच्या जबानीसह ब्रेन मॅपिंग चाचणीतून त्याने पीडित तरुणीवर बलात्कार केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास बंद करुन लोकल कोर्टात सी समरी दाखल होणार असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने बोलताना सांगितले.

१९ वर्षांची पीडित तरुणी ही जालना येथे तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिचा भाऊ चेंबूर परिसरात राहत असून त्याला भेटण्यासाठी ती गेल्या वर्षी मुंबई शहरात आली होती. जुलै महिन्यात तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्याने ती तिच्या घरी निघून गेली. वाढदिवसाची पार्टी संपल्यानंतर ती रात्री तिच्या घराच्या दिशेने जात होती. यावेळी चेंबूर परिसरात तिच्यावर चारजणांनी सामूहिक बलात्कार केला. तसेच हा प्रकार कोणालाही सांगू नकोस, अशी धमकीही दिली होती.

या घटनेनंतर तिची प्रकृती बिघडली, त्यामुळे तिचे वडिल मुंबईत आले आणि तिला जालना येथे घेऊन गेले. तिथे तिची प्रकृती आणखीन खालावली, त्यामुळे तिला तेथील स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिची मेडीकल टेस्ट करण्यात आली असता तिच्यावर लैगिंक अत्याचार झाल्याचा संशय डॉक्टरांना आला. हा प्रकार त्यांनी तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर त्यांनी तिची आपुलकीने विचारपूस केली असता तिने ७ जुलै २०१९ रोजी चेंबूर येथे तिच्यावर चौघांनी सामूहिक बलात्कार केल्याचे सांगितले. तिच्या या जबानीनंतर तिच्या वडिलांनी बेगमपुरा पोलीस स्थानकात चारही अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित चारही आरोपींविरुद्ध ३७६, ३७६ ड, ३४ भादवी कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता. हा गुन्हा मुंबईतील चेंबूर परिसरात घडल्याने त्याचा पुढील तपास चुन्नाभट्टी पोलिसांकडे देण्यात आला. या गुन्ह्यांतील सर्व कागदपत्रे नंतर बेगमपुरा पोलिसांनी चुन्नाभट्टी पोलिसांकडे पाठविले होते. या सामूहिक बलात्काराची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत, या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची विनंती केली होती. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी या सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यांचा तपास एसआयटीकडे सोपविला होता. याच गुन्ह्यांत एका संशयिताला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. मेडीकल रिपोर्ट, कॉल लोकेशन आदी तपासल्यानंतर असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे उघडकीस आले होते.

त्यानंतर संबंधित आरोपीची ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्यात आली. त्यातही या तरुणाने पीडित तरुणीशी फोनवर चर्चा केल्याची कबुली दिली. मात्र तो तिला कधीच भेटला नव्हता. त्यामुळे सामूहिक बलात्कार झाल्याचे कुठलेही पुरावे पोलिसांना अद्याप सापडले नाहीत. आता पोलीस स्थानिक न्यायालयात सी समरी दाखल करणार असल्याचे बोलले जाते.

First Published on: September 22, 2020 11:36 PM
Exit mobile version