कसार्‍यातील विहिरीत डांबर टाकल्याचा प्रकार उघड

कसार्‍यातील विहिरीत डांबर टाकल्याचा प्रकार उघड

शहापूर तालुक्यातील चिंतामणवाडी कसारा हद्दीतील रहिवासी खंडू भागा वातडे या शेतकर्‍याच्या विहिरीत अज्ञात व्यक्तीने रासायनिक पदार्थ तसेच डांबर ओतल्याचा संतापजनक प्रकार उजेडात आला आहे. यामुळे भातशेती पूर्ण जळून खाक झाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कसारा चिंतामणवाडी येथील नागरिक खंडू वातडे (वय ७१) या आदिवासी शेतकर्‍याची मुंबई-आग्रा हायवे लगत दोन एकर शेतजमीन आहे. या जमिनीत जनावरांसाठी तसेच गावकर्‍यांकरिता त्यांनी विहीरदेखील बांधली आहे. या उपयुक्त अशा शेतजमिनीत तसेच विहिरीत काही दिवसांपूर्वी महामार्गावरील ठेकेदार कंपनीच्या कामगारांनी डांबर केमिकल आणि काळे तेल ओतून शेतीचे आणि विहिरीतील पाण्याचे नुकसान केले असल्याचे लेखी निवेदन वातडे यांनी शहापुर तहसीलदारांना दिले आहे. या घटनेकडे रिपाइं अध्यक्ष देविदास भोईर यांनी थेट जिल्हाधिकार्‍यांचेच लक्ष वेधले आहे.

ठेकेदाराने डांबर, केमिकल, काळे तेल शेतात ओतल्यामुळे अर्थात घातक रसायनेयुक्त द्रव्य सुपीक शेतजमिनीवर हेतूपुरस्सर टाकल्यामुळे शेत पूर्णतः काळे पडले असून त्या ठिकाणी उग्र वास सुटला आहे. शिवाय विहिरीचे पाणी देखील वापरण्यायोग्य राहिले नसून त्यातील मासे मृत्युमुखी पडून वर तरंगत असल्याचे खंडू वातडे यांचे म्हणणे आहे. खासगी विहिरीतील पाण्याचे रस्ते ठेकेदार कंपनीने अतोनात नुकसान केले असल्यामुळे त्या विरोधात कारवाई आणि नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी रिपाइंचे कसारा शहराध्यक्ष देविदास भोईर यांनी ठाणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे केली आहे.

First Published on: January 12, 2020 2:04 AM
Exit mobile version