Chief Secretary : राज्याच्या मुख्य सचिवपदी IAS अधिकारी मनोज सौनिक यांची नियुक्ती

Chief Secretary : राज्याच्या मुख्य सचिवपदी IAS अधिकारी मनोज सौनिक यांची नियुक्ती

मुंबई : राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव (Manukumar Srivastava) यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या पदावर वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक (Manoj Saunik) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी सौनिक यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. राज्याचे ४६ वे मुख्य सचिव म्ह्णून सौनिक हे उद्या,  रविवारी संध्याकाळी पदभार स्वीकारतील.

मनोज सौनिक यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती झाल्यानंतरही  सरकारने त्यांच्याकडे  वित्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवला आहे. १९८७ च्या तुकडीचे सनदी  अधिकारी असलेले सौनिक डिसेंबर २०२३ मध्ये सेवानिवृत्त होणार असून, त्यांना मुख्य सचिव म्हणून आठ महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव हे येत्या ३० एप्रिल रोजी  नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. श्रीवास्तव यांना मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुख्य सचिवपदासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, मनोज सौनिक आणि महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची नावे चर्चेत होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज सौनिक यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

दरम्यान, मनोज सौनिक यांच्यानंतर डॉ. नितीन करीर यांना जानेवारी २०२४ मध्ये मुख्य सचिवपदाची संधी मिळू शकते.कारण पुढील वर्षी मार्च- एप्रिल महिन्यात लोकसभा आणि  त्यानंतर ऑक्टोबर २०२४ मध्ये विधानसभा निवडणुका अपेक्षित आहेत. निवडणुकांच्या कालावधीत विद्यमान मुख्य सचिवाला मुदतवाढ देण्याचा प्रघात आहे. त्यामुळे करीर यांना मुदतवाढ मिळू शकते. तशी मुदतवाढ मिळाल्यास  करीर यांना ८ ते ९ महिन्यांचा कालावधी  मिळू शकते. त्यानंतर सुजाता सौनिक यांनाही नोव्हेंबर २०२४ ते जून २०२५ असा आठ महिन्यांसाठी मुख्य सचिवपदाची संधी मिळू शकते. अर्थात त्यावेळी असलेली राजकीय परिस्थिती यावर पुढील परिस्थिती अवलंबून असेल,  असे सूत्रांनी सांगितले.

मनोज सौनिक यांनी महाराष्ट्रात १९९० मध्ये जालनाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून प्रशासकीय सेवेला सुरुवात केली. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक, धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावलेल्या सौनिक यांनी मंत्रालयात वस्त्रोद्योग, परिवहन विभागाचे प्रधान सचिव तर सार्वजनिक बांधकाम, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम केले आहे.

महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयुक्तपदी श्रीवास्तव
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयुक्तपदी मावळते मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी श्रीवास्तव यांच्या नियुक्तीची अधिसूचना आज जारी केली. ही नियुक्ती पदभार स्वीकारल्यापासून पाच वर्षाच्या कालावधीपर्यंत किंवा वयाची ६५ वर्ष पूर्ण होतील यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत असेल, असे  अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.

First Published on: April 28, 2023 7:48 PM
Exit mobile version