जन्मापासूनच्या हृदय दोषावर शस्त्रक्रिया; आरोग्य शिबिरामुळे वाचले चिमुरड्याचे प्राण

जन्मापासूनच्या हृदय दोषावर शस्त्रक्रिया; आरोग्य शिबिरामुळे वाचले चिमुरड्याचे प्राण

पुष्कराज साळुंखे कुटुंबियांसोबत

हृदयात छिद्र आणि पूर्ण ब्लॉक असलेल्या पुष्कराज साळुंखेवर मुंबई सेंट्रलच्या वोक्हार्ड्ट हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सोलापूरच्या ९ वर्षाच्या पुष्कराज साळुंखेला जन्मापासूनच हृदयाचा आजार होता. पुष्कराजला अॅट्रिअल सेप्टल डिफेक्ट म्हणजे हृदयाच्या वरील बाजूस असलेल्या दोन कर्णिकांमध्ये छिद्र आणि हृदयामध्ये पूर्ण हार्ट ब्लॉक निर्माण झाला होता. त्याचं हृदय क्रिया करताना सामान्य कार्य करत नव्हते. यामुळे हृदयाच्या ठोक्यांची गती अचानक सामान्य गतीपेक्षा कमी होत होती. पण, आता पुष्कराजवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याने पुन्हा एकदा तो शाळेत जायला सज्ज झाला आहे.

जन्मापासून होता हृदयाचा त्रास

हृदयाच्या दोषामुळे पुष्कराज त्याच्या वयाच्या इतर मुलांप्रमाणे नियमित शाळेतही जाऊ शकत नव्हता. त्याच्या वयाच्या मुलांशी खेळूही शकत नव्हता किंवा दैनंदिन कामेही करू शकत नव्हता. थोडे अंतर चालल्यावरही त्याला धाप लागत होती. अचानक बेशुद्ध पडत होता. तो वर्षभराचा असताना त्याला असलेल्या आजाराचे निदान झाले होते पण, आर्थिक अडचणींमुळे त्याच्यावर उपचार होऊ शकले नाहीत.

मृत्यू होण्याची होती शक्यता 

अखेर जानेवारी २०१९ मध्ये त्याला वोक्हार्ड्ट हॉस्पिटलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य चिकित्सा शिबिरात आणण्यात आलं. त्यावेळी तपासणी केली असता त्याच्यावर तात्काळ उपचाराची गरज असल्याचं दिसलं. वेळेत उपचार झाले नाहीत तर त्याचं हृदय निकामी होऊन अचानक मृत्यू होण्याची (सडन कार्डिअक डेथ) शक्यता होती. त्यामुळे या मुलाला मार्च २०१९ मध्ये मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ड्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारांसाठी निधीची व्यवस्था करण्यात आली. त्यानुसार, पुष्कराजच्या हृदयाचे छिद्र बंद करणे आणि ड्युअल चेंबर पेसमेकर प्रत्यारोपण या दोन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळी करण्यात आल्या.

अशी केली शस्त्रक्रिया

मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ड्ट हॉस्पिटलमधील बाल हृदयविकार तज्ज्ञ डॉ. मनीष चोखंद्रे यांनी सांगितलं, “एका क्लोजर उपकरणाच्या साहाय्याने हा दोष किंवा उजव्या आणि डाव्या बाजूच्या हृदयातील खुला भाग बंद करण्यात आला. त्याचप्रमाणे ड्युअल चेंबर पेसमेकर बसवण्यात आलं. पेसमेकर बसवल्यामुळे पुष्कराजच्या हृदयाच्या ठोक्यांची गती ही त्याच्या हालचालींप्रमाणे असते आणि ती सामान्य पातळीच्या खाली जात नाही. एसडी बंद करणे आणि परमनंट पेसमेकर प्रत्यारोपण या दोन्ही शस्त्रक्रिया एकाच वेळी क्वचितच करण्यात येतात. ”

“ हा दोष जन्मजात होता. जेव्हा गर्भावस्थेत बाळाचा पडदा व्यवस्थित तयार होत नाही तेव्हा एएसडी होतो. पण एकाच सिटिंगमध्ये केलेल्या डिव्हाइस क्लोजर आणि ड्युअल चेंबर पेसमेकर प्रत्यारोपणाच्या साहाय्याने पुष्कराजची प्रकृती आता व्यवस्थित आहे आणि आता तो शाळेत जाणार आहे.”, असं डॉ. मनीष यांनी सांगितलं.

First Published on: June 24, 2019 8:11 PM
Exit mobile version