ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीला बालक-पालक मित्र

ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या मदतीला बालक-पालक मित्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये सध्या ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु मुंबई महापालिकेशी संलग्न शाळेतील ४० टक्के विद्यार्थी हे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी पालिकेकडून अन्य विद्यार्थ्यांच्या पालकांमार्फत पालक मित्र व बालक मित्र उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाला पालकांसह एनजीओच्या कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत तब्बल १८ हजार ८१४ जण पालक मित्र तर १० हजार २६० जण बालक मित्र म्हणून पुढे आले आहेत. तर एनजीओच्या ६४० कार्यकर्ते विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सज्ज झाले आहेत.

उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ऑनलाईन शिक्षणात अ‍ॅण्ड्राईड फोन मुख्य समस्या आहे. एकापेक्षा अन्य पाल्यांना ऑनलाईन शिक्षणाचा लाभ करून देणे अशक्य असते. अशावेळी पालकांना एकत्र चर्चा करून एका इयत्तेत असणार्‍या पाल्यांचे गट बनवून त्यांची अडचण सोडवण्यास पालक मित्र मदत करतील. ज्या पालकांना आपल्या पाल्याला ऑनलाईन किंवा ऑफलाईन शिक्षणातील समस्या सोडवता येत नाहीत. अशा पालकांना इतर पालक मदत करतील. काही पालक काही अपरिहार्य कारणास्तव शाळेमध्ये वर्कशीटची देवाण-घेवाण करू शकत नसतील तर पालक मित्रांद्वारे वर्कशीटची देवाण-घेवाण करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत. अशा पालकांच्या माध्यमातून आसपासच्या चार ते पाच विद्यार्थ्यांना सामाजिक अंतर राखून शिकण्यास बालक मित्र मदत करतील. शाळेकडून दिलेला अभ्यास, पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, वरच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून खालच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे अशा जबाबदार्‍या बालक मित्र पार पाडत आहेत. पालक, बालक मित्र यांना व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्रित करण्यात आले आहे. पालकांकडूनही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या शाळेसाठी ९५५४ पालक मित्र तर ६२४४ बालक मित्र पुढे आले आहेत. पालिकेशी संलग्न खासगी अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी १८४८ पालक मित्र तर ६२७ बालक मित्र आणि खासगी विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ७४१२ पालक मित्र व ३३८९ बालक मित्रांनी पुढाकार घेतला आहे.

 

४० टक्के विद्यार्थी हे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्याने अनेक पालक आपल्या मूळ गावी गेले आहेत. मुंबई महापालिकेच्या शाळांमधील तब्बल २५ हजार ६३६ विद्यार्थी स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे त्यांची मुले ही ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतील अनेक पालकांकडे अ‍ॅण्ड्राईड मोबाईल नाही, मोबाईल आहे पण नेट पॅक भरण्यास पुरेसे पैसे नाहीत. काही पालकांकडे साधा फोन नसून, काही विद्यार्थ्यांच्या पालकांचे संपर्क क्रमांक शाळेमध्ये नाहीत. त्यामुळे जवळपास ४० टक्के विद्यार्थी हे ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सुशिक्षित, जागरुक पालक सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य आणि स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून पालक, बालक मित्र उपक्रम हाती घेतला आहे.

पालिकेच्या शाळेतील अनेक मुलांच्या पाल्यांकडे अ‍ॅण्ड्राईड मोबाईल उपलब्ध नाही. त्यामुळे सुमारे ४० टक्के विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे मोबाईल सुविधा उपलब्ध आहेत, अशा पालकांच्या माध्यमातून वंचित विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.
– महेश पालकर, शिक्षणाधिकारी, मुंबई महानगर पालिका
First Published on: August 17, 2020 3:02 PM
Exit mobile version