मुंबईच्या बत्तीगुलमागे चीनचा हात ? न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तात दावा

मुंबईच्या बत्तीगुलमागे चीनचा हात ? न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तात दावा

12 ऑक्टोबर 2020 मध्ये देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील बहुतांश भागात अचानक वीज गेली. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने त्याचा परिणाम मुंबईच्या लोकलवरही झाला. त्यावेळी मुंबईची बत्ती गुल करण्यामागे चीनचा हात होता, असा दावा अमेरिकेतील एका कंपनीने केला आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सने एका अभ्यासाचा हवाला देत हा दावा केला आहे.

गलवान हिंसेच्या चार महिन्यांनंतर मुंबईत अचानक बत्ती गुल झाल्याने लोकल ट्रेनही बंद पडल्या होत्या. शेअर बाजार ठप्प झाला होता. वीज गेल्याने दोन कोटी मुंबईकर अंधारात होते. रुग्णालयांमध्ये इमर्जन्सी जनरेटर सुरू करावा लागले होते, जेणेकरुन व्हेंटिलेटर सुरू राहतील. हा तोच काळ होता, जेव्हा भारतात कोरोना शिखरावर होता. मागील वर्षी 12 ऑक्टोबरला मुंबईत ब्लॅकआऊट झाले होते. आतापर्यंतच्या तपासात ही बाब समोर आली आहे की, या सर्व घटना एकमेकांमध्ये गुंतल्या आहेत. त्यावेळी मुंबईतील ब्लॅकआऊटमागे चीनमधून झालेला सायबर हल्ला असू शकतो, असा दावा भारतीय अधिकार्‍यांच्या हवाल्याने काही वृत्तात म्हटले होते.

न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तानुसार, या सगळ्या घटना चीनच्या एका मोठ्या सायबर हल्ला कटाचा भाग होता, ज्याचा उद्देश भारताचा पॉवर ग्रीड ठप्प करणे हा होता. इतकेच नाही तर गलवानमध्ये भारताचा दबाव वाढला तर संपूर्ण देशाला संपूर्ण अंधारात लोटले जाईल, योजना चीनने आखली होती. हिमालयात सुरू असलेल्या कारवायांदरम्यान चिनी मालवेअरने भारतातील वीज पुरवठा करणार्‍या यंत्रणेत घुसखोरी केली होती. यामध्ये हायवोल्टेज ट्रान्समिशन सबस्टेशन आणि थर्मल पॉवर प्लान्टचाही समावेश होता.

चिनी सायबर हल्ल्याचा खुलासा अमेरिकेतील सायबर फर्म रेकॉर्डेड फ्युचरने केला आहे; पण यातील काही मालवेअर अ‍ॅक्टिव्ह झाले नसल्याने मोठा अनर्थ टळला. चीनची कंपनी रेड एकोने सायबर हल्ल्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे भारताचे सुमारे एक डझन पॉवर ग्रीड गुपचूप पद्धतीने नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, हे कंपनीचे वरिष्ठ अधिकारी स्टुअर्ट सोलोमन यांनी म्हटले आहे.

सायबर सेलच्या अहवालात गंभीर खुलासे
मुंबईत झालेल्या बत्तीगुलबाबत महाराष्ट्राच्या सायबर सेलने आपला अहवाल राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सोपवला आहे. यामध्ये सायबर सेलने ३ गंभीर मुद्यांचा उल्लेख केला आहे. यामध्ये मुंबईतल्या एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये हॅकिंगचे प्रयत्न झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा पूर्ण अहवाल ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे सोपवण्यात आला असून त्या आधारावर आता सविस्तर तपास आणि चौकशी होऊ शकेल, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

सायबर सेलच्या अहवालातील गंभीर खुलासे
१) १४ ट्रोजन हॉर्सेस एमएसईबी मुंबईच्या प्रणालीमध्ये टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा पुरावा मिळाला आहे.
२) ८ जीबी डाटा बाहेरच्या सर्व्हरमधून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये ट्रान्सफर झालेला असू शकतो.
३) ब्लॅकलिस्टेड आयपी अ‍ॅड्रेसवरून एमएसईबीच्या सर्व्हरमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न झालेला असू शकतो.

First Published on: March 2, 2021 4:30 AM
Exit mobile version