डोंगरीचे राजाची दानपेटी केरळला

डोंगरीचे राजाची दानपेटी केरळला

केरळमधील महापुरानंतर आजही परिस्थितीला सामोरे जाणे तिथल्या लोकांना अवघड जात आहे. यामुळे येणारी मदत तशी कमीच पडत आहे. विविध राज्यांतून मदतीचा हात पुढे येत असताना मुंबईतील गणेशोत्सव मंडळेही मागे राहिलेली नाहीत. बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरेश दहिबावकर यांनी केलेल्या आवाहनानुसार डोंगरीचा राजाच्या मंडळाने राजाची दानपेटीच केरळसाठी दानरुपी देण्याचा निर्णय घेतला आहे.

केरळमध्ये आलेल्या पुराने तिथली परिस्थिती हाताबाहेर गेली होती. मोठ्या संख्येने वित्त आणि मानवी हानी या पुराने केरळची झाली. यातून बाहेर येण्यासाठी देशभरातून केरळला मदतीच हात दिला जात आहे. राज्यात सुरू असलेल्या गणेशोत्सवातून केरळला मदत करण्याचे आवाहन बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने केले होते. या आवाहनानुसार चिंचबंदरच्या डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यावर्षीची दानपेटी केरळा दान करण्याचा निर्णय घेतला आहे.

या दानपेटीत उत्सवादरम्यान जमा होणारी सारी रक्कम मंडळ केरळसाठी पाठवून देणार आहे. मंडळाचे उपाध्यक्ष निखिल गावंड यांनी ही माहिती दिली. गेल्यावर्षी दानपेटीमधील रक्कम ‘भारत के वीर’ या संस्थेला दान करण्यात आली होती. डोंगरीच्या राजाबरोबरच भांडूप येथील शिवसाई मित्र मंडळानेही आपल्या दानपेटीतील रक्कम केरळमधील पूरग्रस्तांना दान करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंडळाचे सदस्य सागर पवार यांनी सांगितले. याशिवाय पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने बिस्कीट, सॅनिटरी पॅड यासारख्या काही अत्यावश्यक वस्तू केरळला रवाना केल्या आहेत. अभ्युदयनगरचा गणराज मंडळाचे हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. आपल्या राखीव रक्कमेतून ११ हजार १११ रुपयांची मदत त्यांनी केली आहे. यासोबतच नायगावचा विघ्नहर्ता, माटुंगा येथील जीएसबी सेवा मंडळ, काळाचौकीचा महागणपती, तुळशीवाडीचा महाराज, मुंबईचा राजा अशा काही मंडळांनी मदतीचा हात पुढे केला आहे.

मोबाइल चार्ज करण्यासाठी पॉवर बँक 

पुरामुळे वीजपुरवठा करणारी यंत्रणा उध्वस्त झाल्यामुळे केरळवासीयांना संपर्क करताना अडचणींना समोर जावे लागत होते. याकरीता मोबाइल चार्ज करण्यासाठी काही गणेशभक्तांनी कोच्चीवरून पॉवर बँक पाठवल्या आहेत.

ढोल पथकांचीही मदत 

मुंबईत मोठ्या थाटामाटात आणि ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन सोहळे पार पडले आणि बाप्पा मंडपात विराजमान झाले. या दरम्यान ढोलताशा पथकांना मानधन दिले जाते. माणुसकीचा हात म्हणून जोगेश्वरी येथील राजमुद्रा ढोलताशा पथकाने केरळवासीयांना मदत करायचा निर्णय घेतला आहे.   -आदित्य साळुस्कर, पथक प्रमुख, राजमुद्रा ढोल-ताशा पथक

First Published on: September 16, 2018 6:53 AM
Exit mobile version