चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चा आगमन सोहळा; यंदा शतकमहोत्सव

चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चा आगमन सोहळा; यंदा शतकमहोत्सव

आगमनाधिश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आज रंगला असून यंदाचे शतकमहोत्व असल्यामुळे मोठ्या धुमधडाक्यात हा आगमन सोहळा पार पडला. लालबाग, परळ, चिंचपोकळी भागातील भक्तांची चिंतामणीची पहिली झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. मागील वर्षी चिंतामणीच्या आगमन सोहळ्या दरम्यान उत्साही गणेशभक्तांच्या गर्दीमुळे काही ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले होते. ही बाब लक्षात घेऊन यंदा करी रोड येथील पुलावर मोजक्याच कार्यकर्त्यांना परवानगी देण्यात आली असून यंदाचा आगमन सोहळा हा गणेश टॉकिजपासून सुरु झाला.

२०० स्वयंसेवकांसह १ हजार सहाय्यक सदस्य यांची फौज

दरवर्षी या गणरायाच्या आगमनाची सुरुवात ही रेश्मा खातू यांच्या आर्थर रोड येथील कार्यशाळेपासून होते. मात्र, यंदा आगमन मिरवणूक ही चिंचपोकळीच्या धोकादायक पुलामुळे गणेश टॉकीजपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळा आज दुपारी २ वाजता सुरु करण्यात आले. चिंचपोकळीच्या पुलावरून मंडळाचे माजी सचिव महेश पेडणेकर यांच्या नेतृत्वाखाली निवडक कार्यकर्त्यांसह चिंतामणीची मूर्ती गणेश टॉकीजपर्यंत आणली गेली. तसेच भक्तांनी चिंचपोकळी स्थानकावर गर्दी न करता पेरू कंपाउंड दिशेच्या पुलावरून गणेश टॉकीजच्या हिशेने मार्गक्रमण केले. तसेच मंडळाच्या वतीने पोलिसांच्या दिमतीला वेगळ्या ओळखपत्रास २०० स्वयंसेवकांसह १ हजार सहाय्यक सदस्य यांची फौज काळाचौकीचे पोलीस निरीक्षक पोपटराव आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणूकीचे नियंत्रण करण्यात आले असल्याची माहिती चिंचपोकळी चिंतामणीचे अध्यक्ष उमेश नाईक यांनी दिली आहे.

पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन

पश्चिम महाराष्ट्रासह कोकणाला मागील काही दिवसांमध्ये पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे विस्कळीत झालेलं जनजीवन आणि गावांच्या पुनर्वसनासाठी आता देवस्थानांनी पुढाकार घेतला आहे. चिंचपोकळीच्या चिंतामणी मंडळानेदेखील मदतीचा हात पुढे करत पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केले आहे.

First Published on: August 11, 2019 1:02 PM
Exit mobile version