कसाबपासून बचावलेल्या पास्टरचा कुटुंबासह अपघाती मृत्यू

कसाबपासून बचावलेल्या पास्टरचा कुटुंबासह अपघाती मृत्यू

२६/११ च्या मुंबई हल्ल्यात दहशतवादी कसाब आणि त्याच्या साथीदारांनी केलेल्या हल्ल्यातून वाचलेले पास्टर आणि त्यांच्या परिवारावर कालाने घाला घातला आहे. काल २ जुलै रोजी वसईत मुंबई अहमदाबाद महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात प्रोटेस्टंट पंथाचे पास्टर डॉक्टर थॉमस उलेदर यांचा मृत्यू झाला. दुर्देवाची बाब म्हणजे या अपघातात त्यांची दोन मुलं देखील मरण पावली.

नायगांव येथे राहणारे प्रोटेस्टंट पंथाचे पास्टर डॉक्टर थॉमस उलेदर हे आपली पत्नी मेरी, १० वर्षाचा मुलगा बेनी, पाच वर्षाचा दुसरा मुलगा इझायल हे त्या कारने प्रवास करत होते. ते विरारला आपल्या नातेवाईकाकडे एका कार्यक्रमासाठी जात होते.

गुजरात लेनवरन जाताना पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या एका टेम्पोने नॅनो कारला भीषण धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की, कार दुसऱ्या मुंबई लेनवर येऊन पडल्या नंतर दुसऱ्या टेम्पोने पुन्हा उडविले. या अपघातात पास्टर डॉक्टर थॉमस उलेदर आणि त्यांची दोन मुलं जागीच ठार झाली. तर आई मेरी गंभीर जखमी झाली आहे.

त्यांच्यावर वसईच्या प्लॅटिनम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वसईच्या सातीवली ब्रिजवर काल सायंकाळी साडे सहा वाजता हा अपघात झाला. फरार टेम्पोला पालघर जिल्ह्यातील कासा पोलिसांनी अटक केली आहे.

२६/११ ला कामा हॉस्पिटलमध्ये कसाब आणि अबू इस्माइल यांच्या गोळीतून डॉक्टर थॉमस उलेदर वाचले होते. आपल्या बहिणीच्या डिलीवरीसाठी तेथे गेले होते. त्यावेळेस डॉक्टर थॉमस उलेदर सोबत त्यांचे भावजी आणि मित्र होते. त्या तिघांना कसाब आणि अब्बू इस्माइल याने बंधक बनवलं होतं. मात्र त्यातून हे तिघे आश्चर्यकारकरित्या वाचले होते.

मात्र कालच्या अपघातात अखेर कालाने त्यांच्यावर घाला घातलाच. डॉक्टर थॉमस उलेदर हे नायगांव येथील सिटीझन कॉलनीत राहत होते. या घटनेनंतर सध्या परिसरात शोककळा पसरली आहे.

First Published on: July 4, 2019 1:01 PM
Exit mobile version