CoronaVirus – पालिकेकडून लोकांना हवाय फक्त शिधा, हेल्पलाईनवर आले ३७१० कॉल!

CoronaVirus – पालिकेकडून लोकांना हवाय फक्त शिधा, हेल्पलाईनवर आले ३७१० कॉल!

पालिकेची हेल्पलाईन सेवा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉक-डाऊनमुळे सर्व दुकाने व हॉटेल्स बंद पडल्यामुळे गरीब,गरजु तसेच निराधार कुटुंबांची खाण्यापिण्याचे कोणतेही हाल होवू नये यासाठी महापालिकेने बनलेल्या हेल्पलाईनवर सर्वाधिक मागणी ही शिधाचीच होत आहे. नागरिकांना महापालिकेकडून जेवणाच्या पाकिटांऐवजी जीवनाश्यक वस्तुंचीच मागणी होत आहे. आतापर्यंत मुंबईतील ३७१० लोकांनी अन्नधान्यांची मागणी केली आहे, तर त्यातुलनेत अन्नांच्या पाकिटांची मागणी केवळ २१६६ लोकांचीच आहे.

मुंबई महापालिकेने गरीब, गरजु व निराधार तसेच रस्त्यांवर राहणाऱ्या कुटुंबांची तसेच लोकांचे अन्नपाण्याविना हाल होवू नये  यासाठी १८०० २२२ २९२ क्रमांकाची हेल्पलाईन बनवली आहे. या हेल्पलाईनवर ३० मार्च ते १३ एप्रिल २०२० या कालावधीत अन्न पाकिटांसाठी २१६६ लोकांनी संपर्क केला आहे, तर ३७१० लोकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यासाठी विनंती केली आहे. तर ११ लोकांनी राहण्याविषयीची विनंती केली आहे. अशाप्रकारे हेल्पलाईनवर एकूण ६०६८ लोकांनी संपर्क साधून विविध गोष्टींची मागणी केली आहे.

मुंबई महापालिकेकडे नागरिकांकडून शिधाची मागणी होत असली तरी प्रत्यक्षात महापालिकेच्या प्रत्येक विभागांमध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या शिधाची पाकिटे उपलब्ध नाही. त्यामुळे अनेक विभाग कार्यालयांमध्ये शिधाची पाकिटे पोहोचलेली नाही. त्यामुळे महापालिकेची अन्न पाकिटांची मागणी वाढत चालली आहे. महापालिकेच्यावतीने अद्यापही अन्न पाकिटे पुरवण्यात येणाऱ्या लोकांची माहिती संकलित करून त्याप्रमाणे घर असलेल्या आणि चूल पेटत असलेल्या कुटुंबाला शिधा उपलब्ध करून दिल्यास अन्न पाकिटांचा पुरवठा करण्याचा मोठा भार कमी होवू शकतो. परंतु अन्न पाकिटांच्या वाटपांकरता महापालिकेने मोठ्याप्रमाणात मनुष्यबळ कामाला लावले आजे. जे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केल्यास या मनुष्यबळाचाही कमी वापर होणार आहे. परंतु महापालिका स्तरावर याचा अजुनही  विचार होत नाही. महापालिकेच्या हेल्पलाईनवर होत असलेल्या मागणीवरूनही हे स्पष्ट होत आहे. प्रत्येक दिवशी एका वेळेला दीड लाख याप्रमाणे दोन्ही वेळेला अशाप्रकारे तीन लाख लोकांना अन्न पाकिटे वितरीत करावी लागतात.

हेल्पलाईनवर सर्वाधिक मागणी ही शहरात धारावी, दादर या जी-उत्त विभाग, वडाळा शीव या एफ-उत्तर विभाग, पश्चिम उपनगरातील वांद्रे ते सांताक्रुझ एच-पूर्व, गोरेगाव पी-दक्षिण, पूर्व उपनगरात देवनार,गोवंडी एम-पूर्व, चेंबूर एम-पश्चिम या विभागांमधून सर्वाधिक लोकांच्या मागणी होत आहे.

First Published on: April 14, 2020 11:42 PM
Exit mobile version