भिवंडीतील खराब रस्त्यामुळे नागरिक त्रस्त

भिवंडीतील खराब रस्त्यामुळे नागरिक त्रस्त

भिवंडी शहरातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांची नुकत्याच झालेल्या पावसामुळे दुरवस्था झालेली आहे. याबाबत सामाजिक संस्थासह विविध नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. त्याचबरोबर पोलीस शांतता समितीचा बैठकीतही याविषयी तक्रार केल्याने महापालिका प्रशासनाने तातडीने रस्ते दुरुस्त करावे या मागणीसाठी पोलीस निरीक्षकांसह पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी पालिका आयुक्त व बांधकाम विभागास लेखी पत्र दिले आहे. तरीही पालिका अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने आता माजी विरोधी पक्षनेते व एमआयएम पक्षाचे जिल्हाअध्यक्ष खालिद गुडु शेख यांनी तातडीने आयुक्तांना लेखी तक्रार करून रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे. अन्यथा पालिका प्रशासना विरोधात निषेध आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खालिद गुड्डू यांनी एमआयएमच्यावतीने दिला आहे.

शहरातील कल्याण रोड, समदनगर, कामतघर, दरगाह रोड, अशोक नगर, गोपाळ नगर, बाबला कंपाऊंड, ठाणा रोड, भोईवाडा, अवचित पाडा, नुरीनगर, फातमानगर अशा विविध भागातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले आहेत. धार्मिक सण असल्याने नागरिकांच्या तक्रारीवरून पावसाळ्यात पडलेल्या रस्त्यांच्या डागडुजीसाठी पालिकेच्या बांंधकाम विभागाने ठेकेदारांमार्फत माती, खडी व दगड, खडी मातीच्या सहाय्याने शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचा थातुरमातुर प्रयत्न केला. त्यासाठी लाखो रुपये खर्च केले. मात्र, सर्व फोल ठरले आहे. आता शहरातील रस्त्यांवर धुळीचे व खडी मातीचे साम्राज्य पसरल्याने स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. उडत असलेल्या धुळीमुळे शालेय विद्यार्थी सह महिला व नागरिक वाहनचालकांना खोकला श्वसनाचे आजार जडले आहेत.

रस्त्यांवर पडलेल्या खड्यांमुळे भिवंडीत वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचबरोबर मोटारसायकल अपघात होत असून आजपर्यंत 15 मोटारसायकलस्वार जखमी झाले आहेत व 12 किरकोळ अपघात झाले आहेत. अशी माहिती खालिद गुडु यांनी दिली. त्यामुळे वाहनचालकांना आपला जीव मुठीत घेऊन या रस्त्यांवरून प्रवास करावा लागत आहे.

First Published on: November 13, 2019 2:00 AM
Exit mobile version