सणासुदीला धार्मिक स्थळे होणार चकाचक

सणासुदीला धार्मिक स्थळे होणार चकाचक

‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत स्वच्छ मुंबई, सुंदर मुंबई अशी ओळख देण्यासाठी मुंबई महापालिकेने स्वच्छतेसाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. घर, शौचालयासह आता मुंबईतील सर्व धार्मिक स्थळे व प्रमुख सणांमध्ये मुंबईतील मुख्य रस्ते पाण्याने धुवून चकाचक करण्याचा संकल्प महापालिकेने केला आहे. याची सुरुवात महापालिकेच्या एन वार्डकडून करण्यात आली आहे. रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर लाल बहादूर शास्त्री मार्गावरील पंखेशहा दर्गा येथील मस्जिद व समोरील रस्ता हा एम.पी.एस या मशीनने धुण्यात आला आहे.

मुंबईकर प्रवासादरम्यान रस्त्यावर थुंकून रस्ता खराब करतात. त्यामुळे अनेक वर्दळीच्या ठिकाणी अथवा तीर्थस्थळांच्या बाहेरील रस्ते खराब होतात. त्यामुळे धार्मिक स्थळांचा परिसर आणि मुख्य रहदारीची ठिकाणे खराब होऊन तेथे दुर्गंधी पसरते. ही बाब लक्षात घेऊन एन वार्ड पालिकेचे सहाय्यक अभियंता इरफान काझी यांनी मुंबईतील धार्मिक स्थळे व त्यासमोरील रस्ते साफ करण्याची मोहीम हाती घेतली आहे. यासाठी मुंबईत नव्याने आणण्यात आलेल्या एम.पी.एस या मशीनचा वापर करण्यात येणार आहे. या मशीनने रस्ते साफ करणे सोपे असल्याने फारसा त्रासही होणार नसल्याचे इरफान यांनी सांगितले. रमजानमध्ये एलबीएस मार्गावरील पंखेशहा दर्गा पाण्याने धुवून काढून रस्ताही स्वच्छ करून घेत नागरिकांना मुंबई स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. हा उपक्रम फक्त ईदच्या दिवशीच राबवण्यात येणार नसून प्रत्येक सणाच्या वेळी मुंबईतील धार्मिक स्थळे व त्यांच्याबाहेरील रस्ते धुण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मानवता धर्म आणि स्वच्छता हेच परमेश्वराला आवडणारे कार्य आहे आणि आपण प्रत्येकाने ते केलेच पाहिजे. आम्ही एम.पी.एस या नव्या मशीनचा वापर यासाठी करणार आहोत. त्यामुळे यापुढे सर्व धार्मिक स्थळे व त्याबाहेरील रस्ते प्रत्येक सणांत स्वच्छ केले जाणार आहेत.
– इरफान काझी, अभियंता, एन वॉर्ड

First Published on: June 3, 2019 5:13 AM
Exit mobile version