उघडया गटारांची कंत्राटी सयंत्राद्वारे सफाई; कामात फेरफार

उघडया गटारांची कंत्राटी सयंत्राद्वारे सफाई; कामात फेरफार

प्रातिनिधीक फोटो

मुंबई शहर व उपनगरे येथील रस्त्यालगतच्या उघड्या गटारांची सफाई करण्यासाठी पालिकेने ७ वर्षांसाठी कंत्राटदाराकडून भाडेतत्वावर संयंत्रे घेतली होती. त्यासाठी पालिकेने कंत्राटदाराला ३ कोटी ४४ लाख रुपये देऊ केले. या कंत्राटदाराचा कालावधी संपुष्टात येण्यापूर्वी नवीन कंत्राटदार नेमणे आवश्यक असताना पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्यासाठी टेंडर न काढता, नवीन कंत्राटदार न नेमता त्याच जुन्या कंत्राटदाराला पुढील दीड वर्षासाठी कंत्राटकाम व त्यासाठी आणखी ८३ लाख रुपये देण्याचा घाट घातला आहे.

या संबंधित प्रस्तावाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. मुंबईत दरवर्षी २ हजार ते २ हजार २०० मिमी इतका पाऊस पडतो. मुंबईची भौगोलिक स्थिती पाहता अतिवृष्टी झाल्यास सखल भागात पाणी साचते. नाले तुंबतात, नद्यांना पूर आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. त्यातही जर नालेसफाई नीटपणे झालेली नसेल तर त्याचा फटकाही मुंबईकरांना बसतो. पावसाचे साचणारे पाणी पर्जन्य जलवाहिन्यांद्वारे समुद्रात सोडण्यात येते. त्यासाठी रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्यांची सफाई नियमितपणे होणे आवश्यक असते.

रस्त्यालगतची उघडी गटारे साफ करण्यासाठी पालिकेकडे हायड्रोलिक तत्त्वावरील २० संयंत्रे आहेत. त्यापैकी १२ संयंत्रे पालिकेची तर ८ संयंत्रे कंत्राटदाराची भाडे तत्त्वावरील आहेत. त्यापैकी ४ संयंत्रे साज एंटरप्राईजेस या कंत्राटदाराकडून भाड्याने घेण्यात आली. २०१४ ते २०२१ या सात वर्षांसाठी या कंत्राटदाराला पालिकेने पहिल्या वर्षी ३८०० रुपये दर ८ हजार ४०० पाळ्यांसाठी देण्यात आले होते. त्याचा कंत्राट कालावधी डिसेंबर २०२० रोजी संपुष्टात आले. आता त्याच्या जागेवर नवीन कंत्राटदार नेमणे आवश्यक असताना पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी नव्याने टेंडर न मागवता जुन्याच कंत्राटदाराला पुढील दीड वर्षांसाठी कंत्राटकाम देऊ केले. त्यासाठी या कंत्राटदाराला ८३ लाख रुपये देण्याचे पालिकेने मान्य केले. कंत्राटदार १८०० पाळ्यांमध्ये काम करणार आहे. मात्र सदर कंत्राटदाराला काम देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

First Published on: March 11, 2021 8:02 PM
Exit mobile version