मुंबईतील भ्रष्ट पोलिसांची साफसफाई

मुंबईतील भ्रष्ट पोलिसांची साफसफाई

स्वच्छता मोहीम

लाचलुचपत विरोधी विभागाने दीड महिन्यात केलेल्या कारवाईत चार पोलीस अधिकारी अडकल्यामुळे मुंबई पोलीस दलाच्या डागाळलेल्या प्रतिमेला आणखी डाग लागू नये यासाठी पोलीस आयुक्तांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. पोलीस ठाण्यातील वादग्रस्त, भ्रष्ट अधिकारी आणि अंमलदार यांची यादी तयार करून त्यांची बदली साईड ब्रँचला करण्याचे आदेश पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी अप्पर पोलीस आयुक्तांना दिले आहेत. या आदेशामुळे मुंबई पोलीस दलात खळबळ उडाली असून, आयुक्तांच्या आदेशानंतर अप्पर पोलीस आयुक्तांनी यादी करण्यास सुरू केले आहे.

मुंबई पोलीस दलाची नव्या वर्षाची सुरुवातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्याने झाली. दीड महिन्यांत ४ पोलीस अधिकारी एसीबीच्या सापळ्यात अडकले आहेत. एसीबीच्या या कारवाईमुळे पोलिसांच्या प्रतिमा मलीन होत असल्यामुळे खुद्द पोलीस आयुक्त जयस्वाल यांनी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची कानउघडणी केली.

यापुढे असा प्रकार होऊ देऊ नका अशी सूचना आयुक्तांकडून देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही एसीबीच्या सापळ्यात खेरवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना अटक केली . वारंवार सुना देऊनही सुधारणा होत नसल्यामुळे अखेर आयुक्तांनी मुंबईतील पोलीस ठाण्यात स्वछता अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे.

पोलीस ठाण्यात कार्यरत असणार्‍या वादग्रस्त, भ्रष्ट पोलीस अधिकारी आणि अंमलदाराची यादी तयार करून या यादीत असणार्‍या पोलीसाना नियंत्रण कक्ष, विशेष शाखा तसेच हत्यारी विभागात बदली करण्याचे आदेश पोलीस आयुक्त ज्यस्वाल यांनी प्रत्येक अप्पर पोलीस आयुक्त यांना दिले आहे. मुंबईतील ९४ पोलीस ठाण्याचे मिळून पाच प्रादेशिक विभाग असून प्रत्येक प्रादेशिक विभागात असणार्‍या अप्पर पोलीस आयुक्तांनी आपल्या कक्षेत येणार्‍या पोलीस उपायुक्त, सहायक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना यादी तयार करण्यास सांगितले . तक्रारदाराची कामे करण्यास टाळाटाळ करणारे, त्याच्या विरुद्ध अधिक तक्रारी येतात असे अधिकारी अंमलदाराची नावे या यादीत टाकण्याचे आदेश अपर पोलीस आयुक्त यांनी दिले आहे. या यादीत नावे असलेल्या पोलिसांची पोलीस ठाण्यातून उचलबांगडी कऱण्यात येत आहे. त्यांच्या जागी नियंत्रण कक्ष आणि विशेष शाखेतील अधिकारी आणि अंमलदारांना आणण्यात येत असल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी आपलं महानगरला सांगितले.

मुंबईत असलेल्या पाच पोलीस प्रादेशिक विभागाने यादी तयार केली केली असून सर्वात अधिक पोलीस अधिकारी आणि अमलदारच्या नावाची यादी हि उत्तर प्रादेशिक विभाग येथील असुन दक्षिण मुंबई प्रादेशिक विभागाच्या यादीत आतापर्यंत ६ ते ७ अधिकारी याची नावे असून अमलदाराची यादी तयार कऱण्यात येत आहे. मध्य प्रादेशिक विभागाची यादी रिकामी असल्याचा दावा येथील अधिकारी करीत आहे. तसेच पूर्व आणि पश्चिम प्रादेशिक विभागातील यादीतील वादग्रस्त आणि भ्रष्ट अधिकार्‍याचा आकडा मिळू शकलेला नाही.

पोलीस महासंचालक दत्ता पडसळगीकर हे या महिण्यात सेवानिवृत्त होत असून त्यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांना पोलीस महासंचालकपदी बसवण्याची शक्यता असून त्यांचे सध्या चर्चेत आहे. मात्र या दीड महिण्यात झालेल्या एसीबीच्या कारवाईमुळे मुंबई पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्यामुळे हा डाग धुऊन काढण्यासाठी आयुक्तांनी हि वादग्रस्त आणि भ्रष्ट अधिकार्‍यांना काळ्या यादीत टाकण्यास सुरुवात केली असल्याची चर्चा सध्या पोलीस दलात सुरू आहे.

First Published on: February 20, 2019 6:23 AM
Exit mobile version