कुलगुरू गोड बोलणे बंद करा !

कुलगुरू गोड बोलणे बंद करा !

Senate aandolan

मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराची अनेक प्रकरणे काही दिवसांपासून समोर आली आहेत. याविरोधात युवा सेनेसह सर्व सिनेट सदस्यांनी कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर यांना निवदेने दिली होती. कुलगुरूंनी यावर ठोस कारवाई करण्याऐवजी त्याकडे दुर्लक्ष करत सिनेट सदस्यांच्या कोणत्याच पत्रांना उत्तरे न दिल्याचा आरोप करत शुक्रवारी युवा सेनेच्या सिनेट सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सर्व सिनेट सदस्यांनी थेट फोर्ट येथील कुलगुरू कार्यालयातच ठिय्या आंदोलन करीत कुलगुरूंविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

मुंबई विद्यापीठाचा परीक्षा विभागाने नव्या उत्तरपत्रिका छापण्याचा घेतलेला निर्णय असो किंवा रत्नागिरी उपकेंद्राची झालेली दयनीय अवस्था असो, यांसारख्या अनेक प्रश्नांबाबत मुंबई विद्यापीठाच्या सिनेट सदस्यांनी काही दिवसांपासून आवाज उठवत कुलगुरु सुहास पेडणेकर यांच्याकडे निवदेन दिली होती. मात्र कुलगुरू कार्यालयाकडून यासंदर्भात कोणतेही उत्तर अद्याप देण्यात आले नाही. परिणामी हजारो विद्यार्थ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत.याविरोधात युवा सेनेच्या सर्व सिनेट सदस्यांकडून आज थेट कुलगुरू कार्यालयातच आंदोलन सुरु करण्यात आले. यावेळी सिनेट सदस्यांकडून हातात पोस्टर्स घेऊन सुहास पेडणेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू केली. ‘कुलगुरू गोड बोलणे बंद करा, पत्रांना उत्तर द्या’ अशा घोषणा देत कुलगुरू समोरच जमिनीवर बसून सदस्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले.त्यानंतर प्र-कुलगुरु रवींद्र कुळकर्णी, कुलसचिव सुनील भिरूड आणि युवा सेनेचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत, सुप्रिया करंडे, वैभव थोरात, शशिकांत झोरे, प्रवीण पाटकर शीतल देवरुखकर यांच्यासह कार्यकारी सदस्य साईनाथ दुर्गे यांच्यामध्ये बैठक झाली.

मागण्या मान्य करण्याचे तातडीचे पत्र
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी नोंदणीकृत पदवीधर सिनेट सदस्य, कुलगुरु व इतर अधिकार्‍यांसोबत बैठक घेण्यात येईल. 14 डिसेंबरला कुलगुरु आढावा बैठक व पुढील मागण्यांच्या संदर्भात आराखडा सादर करणार आहेत. कलिना संकुल, ठाणे उपकेंद्र, कल्याण उपकेंद्र, रत्नागिरी उपकेंद्र येथे विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेपर्यंतची सुविधा पुरवली जाईल, कलिना संकुलात सीसीटीव्ही कॅमेरे, मादाम कामा वसतीगृहातील फी बाबतचा निर्णय घेण्यासाठी सिनेट सदस्यांची नेमणूक व पाठपुरावा करुन सामूहिक निर्णय, मोबाईल अ‍ॅपची सिनेट सदस्य पाहणी करून त्यातील सुचवलेल्या त्रुटी दूर लवकरात लवकर दूर करू असे विविध प्रश्नांबाबत कुलुगरूंनी लेखी स्वरूपात युवासेना सिनेट सदस्यांना पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

First Published on: December 8, 2018 5:03 AM
Exit mobile version