क्लस्टरला सुरुवातीलाच नष्टर ! धोरणाला ठाण्यातील नागरिकांचा कडाडून विरोध

क्लस्टरला सुरुवातीलाच नष्टर ! धोरणाला ठाण्यातील नागरिकांचा कडाडून विरोध

ठाणे शहराची नवनिर्मिती करणाऱ्या बहुचर्चित क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला असून शहरातील ४४ ठिकाणी नागरी पुनरूत्थान आराखडा राबवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या प्रकल्पाच्या फेरबदलाविषयी नागरिकांच्या हरकती आणि सूचना असल्यास ३० दिवसांच्या आता नोंदवण्याचे आवाहन ठामपाने केले आहे. त्यानुसार मुदतीच्या सुरुवातीलाच संपूर्ण ठाणे शहरातून यावर हरकती आणि सूचनांचा पाऊस पडत आहे. क्लस्टर योजना ही ठाणेकरांना बेघर करण्याचा सरकार आणि पालिकेचा डाव असल्याची भावना हरकत नोंदवण्यासाठी आलेल्या ठाणेकरांनी व्यक्त केली. या हरकतींमध्ये क्लस्टर योजनेला विरोध करणाऱ्या हरकतींची संख्या मोठी असून क्लस्टरच्या सुरुवातीलाच नष्टर लागल्याचे चित्र आहे.

गुरुवारी काबुरबावडी येथील नागरिकांनी एकत्रितरित्या प्रचंड संख्येने येऊन आपल्या हरकती नोंदवल्या. अचानक मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांमुळे प्रशासनाची पुरती दैना उडाल्याचे चित्र ठाणे महापालिकेत पहावयास मिळत होते. त्यामुळे अधिक सुरक्षारक्षकांची कुमक मागवावी लागली. नागरिकांना रोखताना काही वेळाकरिता परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. मात्र सुरक्षारक्षकांनी वेळीच सर्वांना शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या हरकती नागरी सुविधा केंद्रापर्यंत रांगेने जाण्यास सांगितले. त्याशिवाय नागरी सुविधा केंद्रातही या सूचना घेण्यासाठी अधिक खिडक्यांची सोय करण्यात आली. त्यामुळे गर्दी आटोक्यात आली.

विरोधासाठी ठाणेकर एकवटले

हा तर ठाणेकरांना बेघर करण्याचा डाव
या सर्व हरकती आणि सूचना क्लस्टरच्या विरोधातच असल्याचे आलेल्या नागरिकांनी सांगितले. ठाणे महानगर पालिका क्लस्टरच्या माध्यमातून आमच्या राहत्या जागा ताब्यात घेण्याचा डाव आखत आहे. या धोरणाला आमचा कडाडून विरोध असणार आहे. जोपर्यंत क्लस्टरबाबत आम्हाला योजनाबद्ध आणि धोरणात्मक बाबी सांगितल्या जात नाही तोपर्यंत आमचा क्लस्टरला विरोध राहिल. याउपर जर प्रशासनाने जबरदस्तीने हा प्रकल्प आमच्यावर लादला तर त्याविरोधात तीव्र आंदोलन करू असा इशारा यावेळी आपल्या हरकती मांडणाऱ्या सागर पाटील, आरिप वरेकर, अमीक शेख आदी ठाणेकरांनी दिला.

First Published on: May 25, 2018 8:07 AM
Exit mobile version