‘तोंडाच्या वाफेचे इंजिन चालणार नाही’, मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका

‘तोंडाच्या वाफेचे इंजिन चालणार नाही’, मुख्यमंत्र्यांची राज ठाकरेंवर टीका

देवेंद्र फडणवीस

‘काँग्रेसकडे वक्ते नसल्याने त्यांना भाड्याने वक्ते घ्यावे लागत आहे. कुणी सायकल घेतं, कुणी मोटारसायकल घेतं, पण काँग्रेसने आता रेल्वे इंजिन भाड्यानं घेतलंय. पण तोंडाच्या वाफेवर इंजिन चालत नाही. त्यासाठी ताकद लागते’, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यवर डोंबिवलीत केली. ‘ते रोज व्हिडिओ दाखवतात. पण लोकांनी तुमचा व्हिडिओ पाहून तुम्हाला घरी पाठवले. आता काहीच काम धंदा नसल्याने रात्रभर इंटरनेटवर बसतात आणि व्हिडीओ काढतात. पण युट्यूब वरचे सर्वच व्हिडीओ खरे नसतात’, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी राज यांच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’वर लगावला.

कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ फडके रोडवरील आप्पा दातार चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. याप्रसंगी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नरेंद्र पवार आदी भाजपची दिग्गज मंडळी उपस्थित होती.


भगतसिंग, बालाकोट, अटलजींच्या अंत्ययात्रेचं फूटेज…राज ठाकरेंचे नवे खुलासे!

‘काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा’

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, ‘काँग्रेसने गरिबी हटवण्याची घोषणा केली. राहुल गांधी यांचे पणजोबा, आजी आणि वडील यांनी गरिबी हटवण्याचा नारा दिला. पण गरिबी हटली नाही. राहुल गांधी काय खाऊन गरिबी हटवणार?’ असा सवाल त्यांनी केला. सर्वसामान्यांना ७२ हजार देणार, पण हे कुठून देणार? हे मात्र त्यांना सांगता येत नाही. काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे कोंबड्या विकण्याचा धंदा आहे’, अशी टीका देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. ‘केवळ खासदार निवडून आणणारी ही निवडणूक नसून, राष्ट्रीय सुरक्षेची निवडणूक आहे. देशाची सीमा सुरक्षित कोण ठेवू शकतो? हे ठरवणारी ही निवडणूक आहे’, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

First Published on: April 25, 2019 10:34 PM
Exit mobile version