शिवसेनेच्या आमदारांवर मुख्यमंत्र्यांची करडी नजर

शिवसेनेच्या आमदारांवर मुख्यमंत्र्यांची करडी नजर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले असून, हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असेपर्यंत सभागृहात रोज सर्व आमदारांनी उपस्थित राहायला हवे, असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांना दिला होता. मुख्यमंत्र्यांच्या याच आदेशाचे पालन त्यांच्याच पक्षातील आमदार करतात का? यावर खुद्द मुख्यमंत्र्यांनी करडी नजर ठेवली आहे. नुसती करडी नजरच नाही तर शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या हजेरीचा रोजचा रिपोर्टच घेतला जात आहे. त्याची जबाबदारीही शिवसेनेच्या दोन आमदारांकडे देण्यात आली आहे.शिवसेना आमदार अजय चौधरी आणि रमेश कोरगावकर यांच्याकडे आमदारांच्या हजेरीची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

अशी होते रोज हजेरी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेचे सर्व आमदार रोज हजर राहतात का? सकाळी किती वाजता येतात आणि कधी जातात याचा रिपोर्टच जणू मुख्यमंत्र्यांकडे रोज जात असल्याचे समजते. त्यामुळे महाविकास आघडीच्या आमदारांना आदेश दिल्यानंतर शिवसेनेचे आमदार ते पाळतात का? याकडे मुख्यमंत्र्यांचे बारीक लक्ष आहे. दरम्यान काही आमदारांशी याविषयी खासगीत बोलले असता त्यांनी याला दुजोरा दिला असून, शिवसेनेत आदेश दिल्यानंतर त्याचे नेहमीच शिवसैनिक पालन करत असतो. तसेच मुख्यमंत्र्यांनी देखील दिलेल्या या आदेशाचे पालन करून आम्ही आमची सभागृहात रोज उपस्थिती लावतो आणि आम्ही सभागृह संपेपर्यंत सभागृहात हजर असतो असे सांगितले.

दरम्यान महाविकास आघडीच्या आमदारांच्या बैठकीत सरकारला अडचण निर्माण होईल असे कुणीही वक्तव्य करू नये अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी तिन्ही पक्षाच्या आमदारांना दिली होती. शिवसेनेचे आमदार याचे देखील कटाक्षाने पालन करत असून, शिवसेनेचे मंत्री आणि काही नेते वगळता सोडता इतर आमदार फारसे माध्यमाशी बोलताना दिसत नाही.

पाच वर्षे सरकार टिकवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कसली कंबर
दरम्यान विरोधकांकडून हे सरकार फार काळ टिकणार नाही अशी वारंवार टीका होत असताना हे सरकार पाच वर्षे टाकावे याची काळजी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेत असून, याची सुरुवात ते स्वतःच्या पक्षातील आमदारांना शिस्त लावून करत आहेत. तसेच महाविकास आघाडी कोणत्याही अशा मुद्द्यावरून दुखावू नये याची देखील काळजी उद्धव ठाकरे घेत आहेत.

First Published on: February 29, 2020 5:46 AM
Exit mobile version