मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर फाईलमध्ये फेरफार

मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर फाईलमध्ये फेरफार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या महत्वाच्या फाईलमध्ये परस्पर फेरफार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी एका अभियंत्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. या फाईलमधील मजकूर मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर बदलण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हा धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर मंत्रालयात खळबळ उडाली असून या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्या संबंधित फाईलवर सहीदेखील केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर या फाईलमधील मजकूर परस्पर बदलण्यात आला असल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिली. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर स्वाक्षरीच्या वरच्या भागात लाल शाईने एक अतिरिक्त मजकूर लिहिण्यात आला. त्यामध्ये संबंधित अभियंत्याची चौकशी बंद करावी, असा शेरा लिहिण्यात आला होता. दरम्यान, अशी चर्चा कोणत्याही महत्वाच्या निर्णयात मुख्यमंत्र्यांची परवानगी ही अंतिम मानली जाते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरी महत्वाच्या असतानाच मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर दिलेला शेरा बदलण्याची हिंमत मंत्रालयात कोणीतरी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समधील बांधकामात अनियमितता झाल्याच्या कारणावरून सार्वजनिक बांधकाम खात्यातील अनेक अभियंत्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये फेरफार करण्यात आलेल्या फाईलमधील अधीक्षक अभियंता नाना पवार यांचाही समावेश असल्याची माहिती आहे. दरम्यान, महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चौकशीची ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. मुख्यमंत्र्यांना चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठवलेला असताना मुख्यमंत्र्यांनी चौकशी बंद करण्याचा आदेश देण्यात आल्याचे पाहून अशोक चव्हाण यांना धक्का बसला.

तपासणीत झाले उघड

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी अन्य अभियंत्यांच्या चौकशीला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, त्यामधून नाना पवार यांचे नाव नव्हते. मुख्यमंत्र्यांची सही असलेल्या लहान जागेत हा शेरा होता. नेहमी मुख्यमंत्री सही करताना मजकूर आणि सहीमध्ये पुरेशी जागा ठेवतात. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या मनात फाईलवरील शेर्‍याबद्दल संशय निर्माण झाला आहे. मात्र, फाईलवरील शेर्‍याबद्दल संशय निर्माण झाल्याने चव्हाण यांनी ही फाईल पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली. एखाद्या फाईलवर सही केल्यानंतर त्या फाईल स्कॅन केल्या जातात. यावेळीच तपासणी करताना मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या वरच्या भागात असा कोणताही शेरा नसल्याचे उघड झाले.

 

First Published on: January 25, 2021 4:45 AM
Exit mobile version