कुणीही यावं, टपली मारून जावं, हे चालणार नाही – मुख्यमंत्री

कुणीही यावं, टपली मारून जावं, हे चालणार नाही – मुख्यमंत्री

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी कंगना रनौतवर आणण्यात आलेला हक्कभंग प्रस्ताव आणि अर्णब गोस्वामी यांच्यावर झालेली अटकेची कारवाई या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या मुद्द्यांवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या परखड टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात उत्तर दिलं. ‘ईडी, सीबीआयला नोकराप्रमाणे राबवून जर कुणी राजकारण वेगळ्या दिशेला नेऊ पाहात असेल तर कुणीही यावं आणि टपली मारून जावं हे आम्ही चालू देणार नाही’, असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी भाजपचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे सुनावलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘ज्यांनी तुमच्या आवडीच्या व्यक्तीवर हक्कभंग आणला, त्यांच्यावर तुम्ही ईडी आणणार? प्रताप सरनाईक यांच्यावर ईडी लावली, त्यांच्या मुलावर ईडी लावली, त्यांच्या भावावर ईडी लावली. उद्या त्यांना नातू झाला, तर त्यालाही सांगतील ईडीमध्ये घेऊन यायला. ईडी, सीबीआयची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचं काम कुणी करत असेल, त्यांना आपल्या घरातल्या नोकराप्रमाणे राबवून राजकारण वेगळ्या दिशेने नेत असेल तर हे विकृत राजकारण आम्ही सहन करू शकत नाही. कुणीही उठावं आणि आम्हाला टपली मारून जायचं आणि आम्ही ते सहन करायचं, हे होणार नाही.’

तुम्ही इकडेच थांबा…!

दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांना देखील चिमटे काढले. ‘देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीला जायला हवं. सगळ्यांची तीच इच्छा आहे. खासकरून मुनगंटीवारांची इच्छा आहे. ते देशाचा विचार करतात’, असं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी नाना पटोलेंनी ‘तुम्ही आमच्या मित्राच्या मागे का लागता?’, असं म्हणून चिमटा काढला असता, ‘तुम्ही इकडेच थांबा’, असं म्हणून मुख्यमंत्र्यांनी कोटी केली.’

विरोधाला विरोध करू नका!

मुंबई मेट्रोचं कारशेड आरेमधून कांजूरमार्गला नेण्याच्या मुद्द्यावर देखील मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या आक्षेपांना यावेळी उत्तर दिलं. ‘आरे प्रकल्पावर आक्षेप आहेत. पण प्रोजेक्ट म्हटलं की त्याला विरोध होतोच, आंदोलनं होतातच. त्यातून आपण मार्ग काढायचा असतो. समृद्धी महामार्गावर देखील आक्षेप घेतले गेले. पण त्यातून आपण मार्ग काढलाच. वाढवण बंदरावर आक्षेप असूनही केंद्र सरकार ते लादतच आहे ना? बुलेट ट्रेनची मागणी कुणी केली होती? बुलेट ट्रेन मुंबईच्या फायद्यासाठी आहे का? मुंबईतल्या मोक्याच्या जागेचा वापर बुलेट ट्रेनसाठी होतोय. बुलेट ट्रेन कुणी मागितली होती? आपल्याकडे बुलेट ट्रेनचे चारच स्टेशन येणार आहेत. बाकीचे गुजरातमध्ये होणार आहेत. मुंबईतून किती लोकं बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाणार आहेत? मी जर अडून बसलो की ही मुंबईची जागा आहे, मी इथेच कारशेड करणार. मग काय करणार? त्यामुळे आरे प्रकल्पात असा मीठागराचा खडा टाकू नका. राज्याच्या विकासाच्या आड आपलं राजकारण येऊ नये’, असं ते म्हणाले.

First Published on: December 15, 2020 7:26 PM
Exit mobile version