मुख्यमंत्री शिंदेंकडून मच्छीमारांना दिलासा; कोस्टलच्या दोन खांबांमधील अंतर १२० मीटर

मुख्यमंत्री शिंदेंकडून मच्छीमारांना दिलासा; कोस्टलच्या दोन खांबांमधील अंतर १२० मीटर

 

मुंबईः मुंबईच्या वरळी कोळीवाड्यातील मच्छीमार बांधव हे स्थानिक आहेत. भूमिपूत्र आहेत. आमच्या सरकारने कायम सर्वसामान्यांच्याच हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे वरळी कोळीवाड्यानजीकच्या कोस्टल रोडच्या बांधकामामुळे स्थानिक मच्छीमारांच्या जीवनावर परिणाम होऊ नये यासाठी खांबाचे अंतर ६० मीटरवरून १२० मीटर करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक मच्छीमारांना दिले.

त्यासाठी ६५० कोटींचा वाढीव खर्च होणार आहे. तो वाढीव खर्चही करण्यात येईल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यामुळे वाढणारा कालावधी युद्ध पातळीवर काम करून भरून काढण्यात येईल, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

कोस्टल रोडच्या बांधकामासंदर्भात वरळी कोळीवाड्यातील स्थानिक नागरिकांनी काही प्रश्न उपस्थित केले होते. मासेमारीला अडचण येऊ नये यासाठी कोस्टल रोडच्या दोन खांबांमधील अंतर वाढवावे. खांब क्रमांक ७ आणि ९ दरम्यानचा खांब क्रमांक ८ हटवावा अशी त्यांची मागणी होती. एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात तत्काळ एका समितीचीही स्थापना केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिंदे यांच्यासोबत स्थानिक मच्छीमार समितीची बैठकही झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल या बैठकीला उपस्थित होते.

आमच्या सरकारने सातत्याने सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. त्यानुसार वरळी कोळीवाड्यातील नागरिकांनाही न्याय देण्यात येईल. दोन खांबांमधील अंतर १२० मीटर करण्यात येणार आहे. सध्या तेथील ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवे काम करण्यात येईल. यामुळे प्रकल्पाचा खर्च ६५० कोटींनी वाढणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले.

यावेळी शिंदे यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांचेही कौतुक केले. ते म्हणाले, आम्ही समृद्धी महामार्गाचे काम जसे वेगाने केले. तसेच चहल हे कोस्टल रोडचे काम वेगाने करत आहेत. कोळीवाड्याच्या सीमांकनाचा मुद्दाही तत्काळ निकाली काढणार आहे. त्यासाठी समिती नेमणार आहे. मुंबईच्या सुशोभीकरणात कोळीवाड्यांचा वारसा जपला जाईल.

First Published on: December 15, 2022 8:29 PM
Exit mobile version