यशवंत जाधव यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी शिवसेनेचा एक गट सक्रीय

यशवंत जाधव यांना स्थायी समितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यासाठी शिवसेनेचा एक गट सक्रीय

महापौर किशोरी पेडणेकर आणि यशवंत जाधव यांच्यातील शितयुध्दाला सुरुवात

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसह वैधानिक समिती व विशेष समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक येत्या ५ ऑक्टोबरपासून होत आहे. मात्र, विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना पदावरुन बाजुला करण्यासाठी महापालिकेतील शिवसेनेचा एक गट जोरदार सक्रीय झाला आहे. महापौर आणि जाधव यांच्यातील शितयुध्दाला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे जाधव यांना हटवून त्यांच्या जागी नवीन अध्यक्षाची वर्णी लावण्याची जोरदार मोर्चेबांधणी महापालिकेतील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये सुरु असल्याचे दिसून येत आहे.

स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती व बेस्ट समितीच्या अध्यक्षपदाची मुदत संपुष्टात आली आहे. कोविडमुळे या निवडणुका एप्रिल महिन्यात न झाल्याने आता या निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार ५ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे या समित्यांवरील निवृत्त सदस्यांच्या रिक्त जागी नवीन सदस्यांची निवड येत्या २८ सप्टेंबरला होणार आहे. या सर्व समित्यांमध्ये स्थायी समिती ही महत्वाची मानली जात आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून अध्यक्षपदी असलेल्या यशवंत जाधव यांना या पदापासून दूर करण्यासाठी शिवसेनेचा महापालिकेतील एक गट सक्रिय झाला आहे. मातोश्रीपासून ते मंत्रालयापर्यंत फिल्डींग लावत आपली ताकद वापरली जात आहे. कोणत्याही परिस्थितीत जाधव यांना या पदापासून हटवण्यासाठी त्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. विशेष म्हणजे महापालिकेतील शिवसेनेचे सर्व नेते या एका गटात असून त्यांना हटवून त्यांच्या जागी त्यांचे कट्टर विरोधक असलेल्या रमाकांत रहाटे किंवा अमेय घोले यांना यापदावर बसवण्याची रणनिती आखली जात आहे. रहाटे यांनी अनेक वर्षे स्थायी समितीचे सदस्यपद भुषवलेले आहे. त्या तुलनेत घोले हे कधी समिती सदस्य नव्हते. त्यामुळे या समितीच्या कामकाजाचा त्यांना अनुभव नाही. त्यामुळे घोले यांच्या मार्गात तांत्रिक अडथळा आहे. तरीही जाधव आपली ताकद लावून पुन्हा अध्यक्षपदाची उमेदवारी पुन्हा मिळवतात की त्यांना डावलून रहाटे अथवा अननुभवी घोले यांना उमेदवारी देत शिवसेना आजवरची प्रथा आणि परंपरा मोडीत काढतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

मागील काही महिन्यांमध्ये महापौर किशोरी पेडणेकर आणि यशवंत जाधव यांच्यातील वाद पराकोटीला गेले आहेत. त्यामुळे या वादाच्या ठिणगीने ज्वालेचे रुप धारण केले आणि पेटलेल्या अग्निकुंडातच आजवर झालेल्या अपमानाच्या सुडाचा बळी देण्यासाठी जोरदार तयारी सुरु असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यशवंत जाधव यांना सहजासहजी अध्यक्षपदाची उमेदवारी मिळवणे शक्य वाटत नाही. विशेष म्हणजे शिवसेनेच्या या गटाने आता विरोधी पक्षालाही आपल्या हाताशी धरल्याने याठिकाणी बदल अपेक्षित मानला जात आहे. त्यामुळे पक्ष आता कुणाच्या बाजुने उभा राहतो याकडेच सर्वांचे लक्ष आहे. एका बाजुला भाजप आक्रमक होत असताना दुसरीकडे महापालिकेतील शिवसेनेत दुफळी माजताना दिसत आहे. महापालिकेत शिवसेनेचे दोन गट मानले जात आहेत. त्यामुळे महापौर आणि यशवंत जाधव यांच्यापैकी कुणाच्या गटाचे वजन अधिक आहे हे येत्या ३० सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी स्पष्ट होईल.

 

First Published on: September 24, 2020 6:14 PM
Exit mobile version