परिवहन समिती सभापतीपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच

परिवहन समिती सभापतीपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच

आरटीईवर धनदांडग्याचा डल्ला; शिक्षण विभागाकडून चौकशी सुरु

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या परिवहन समिती सभापतीपदासाठी शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाली आहे. नव्याने परिवहन समितीत दाखल झालेल्या एका सदस्यांकडून जोरदार फिल्डींग लावण्यात आली आहे. मात्र अनुभवी सदस्यांना सभापतीपद मिळावे, अशी सेनेच्या एका गटाची मागणी आहे. त्यामुळे अनुभवी आणि नवखे, असा वाद उफाळण्याची शक्यता आहे.

समिती सभापतीचा टर्म संपतोय

परिवहन समिती सभापती सुभाष म्हस्के यांची टर्म येत्या २८ फेब्रुवारी रोजी संपत आहे. त्यामुळे परिवहन समिती सभापतीपदाच्या रिक्त होणाऱ्या जागेसाठी निवडणूक घेतली जाणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम येत्या दोन ते तीन दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. परिवहन समितीत शिवसेना आणि भाजप युती असून, सध्या शिवसेनेचे ७ आणि भाजपचे ६ सदस्य आहेत. सभापतीपदाच्या वाटाघाटीप्रमाणे यंदाची सभापतीपदाची टर्म ही शिवसेनेची आहे. त्यामुळे सभापतीपदासाठी शिवसेनेत जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. कल्याण पूर्वेच्या वाटयाला एकदाच परिवहन सभापती मिळाले होते. नवीन गवळी हे सभापती झाले होते, तो कालावधीही कमी होता. मात्र त्यानंतर कल्याण पूर्वेच्या वाट्याला सभापतीपद मिळालेले नाही. त्यामुळे यंदा कल्याण-पूर्वेला सभापतीपदाचा मान देण्यात यावा, अशी सेनेच्या सदस्यांची मागणी आहे.

नवख्या सदस्यांनाही सभापतीपदाचे वेध

शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य मधुकर यशवंतराव (नाना) आणि मनोज चौधरी हे दोन सदस्य सभापतीपदाच्या स्पर्धेत असून, दोघांची नावे चर्चेत आहेत. दोन्ही सदस्यांना परिवहन समितीचा दांडगा अनुभव आहे. काही दिवसांपूर्वीच परिवहन समिती सदस्यपदी शिवसेनेकडून ३ आणि भाजपकडून ३ सदस्य निवडून आले आहेत. नव्याने सदस्य झालेल्या सदस्यांनाही सभापतीपदाचे वेध लागले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडूनही सभापतीपदासाठी वरिष्ठ पातळीवर लॉबींग सुरू आहे. मात्र परिवहनच्या कामाचा अनुभव असल्याशिवाय नवख्यांना सभापतीपद देण्यास अनुभवी सदस्यांचा जोरदार विरोध आहे. त्यामुळे सभापतीपदाची माळ अनुभवी की नवख्या सदस्यांच्या गळयात पडते याकडं लक्ष वेधले आहे.

First Published on: February 22, 2019 8:20 PM
Exit mobile version