मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे दर्शन, पालिकेकडे १२० खड्डयांच्या तक्रारी!

मुंबईच्या रस्त्यांवर पुन्हा खड्डे दर्शन, पालिकेकडे १२० खड्डयांच्या तक्रारी!

रस्त्यावर खड्डे

मागील काही दिवसांपासून मुंबईला पाऊस झोडपून काढत असून या मुसळधार पावसामुळे अनेक खराब रस्त्यांवर पुन्हा एकदा  खड्डयांचे दर्शन होऊ लागले आहे. मात्र, कोविडमुळे रस्त्यांवरील या खड्डयांकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष नसून तक्रारीनंतर अनेक दिवसांनी ते बुजवले जात आहेत. आतापर्यंत मुंबईच्या रस्त्यांवर १२० हून अधिक खड्डयांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ८४ खड्डे बुजवल्याची माहिती मिळत आहे. सध्या महापालिकेकडे खड्डयांची शंभरी झाली असली तरी प्रत्यक्षात हे खड्डयांचे प्रमाण अधिकच असल्याचे  दिसून येत आहे.

सध्या कोविडमुळे मुंबई महापालिकेचे सर्व लक्ष हा आजार नियंत्रणात आणण्याकडे आहे.परंतु मान्सूनपूर्व कामांकडे यंदा प्रशासनाने योग्यप्रकारे लक्ष न दिल्यामुळे अनेक भागातील नाल्यांची सफाई योग्यप्रकारे झाली नसल्याच्या तक्रारी समोर येत आहे. त्यातच कोरोनामुळे मनुष्यबळाअभावी रस्त्यांची कामे न झाल्याने यावर्षी रस्त्यांवर खड्डयांचे दर्शन घडेल,असा एक अंदाज वर्तवला जात होता. तो अंदाज मागील काही दिवसांतील मुसळधार पावसानंतर खरा ठरताना दिसत आहे. मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरांतील रस्त्यांवर अनेक ठिकाणी खड्डे दिसून येत आहे. यामुळे अनेकदा दुचाकी स्वाराचा अंदाज चुकला जातो तर वाहनांची गती संथ होवून वाहतूक कोंडी  निर्माण होते.

कोरोनाच्या काळात मुंबईकर जास्तीत जास्त रस्त्यांवर नसल्याने खड्डे असूनही त्याची मोठी समस्या निर्माण होताना किंवा आरडा ओरड होताना दिसत  नाही. परंतु आजही काही जागरुक नागरिक आहे, जे खड्डयांचे फोटो पॉटहोल ट्रॅकींग सिस्टीमवर ‘माय बीएमसी पॉटहोल ६८’वरअँड्राईड मोबाईलद्वारे अपलोड करत आहेत.  ज्यामध्ये आतापर्यंत विविध प्राधिकरणाच्या हद्दीसह महापालिकेच्या हद्दीतील तसेच विभाग कार्यालय आणि रस्ते विभाग आदींच्या अखत्यारित येणाऱ्या रस्त्यांवरील खड्डयांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. ज्याद्वारे डांबरी रस्त्यांवरील खड्डा  २४ तासांमध्ये तर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांवरील खड्डा ४८ तासांच्या आतमध्ये भरणे बंधनकारक आहे.

त्यानुसार रस्ते विभागाच्या अखत्यारितील अर्थात हमी कालावधीतील रस्त्यांवर २७ खड्डे असून त्यातील २१ खड्डे बुजवले गेले आहे. तर विभाग कार्यालयांच्या हद्दीतील  रस्त्यांवर ६७ खड्डे असून त्यातील ६१ खड्डे बुजवले गेले आहे. महापालिका व्यतिरिक्त इतर प्राधिकरण व इतरांच्या हद्दीतील रस्त्यांवर २१ खड्डे असून त्यातील एकही खड्डा बुजवला गेला नाही. त्यामुळे अशाप्रकारे एकूण प्राप्त १२० खड्डयांपैकी केवळ ८४ खड्डे बुजवले गेले असल्याची माहिती प्राप्त होत आहे.  सध्या कोविडमुळे काही जागरुक नागरिकांकडूनही खड्डयांची ही छायाचित्र अपलोड केली जात असली तरी भविष्यात या माय बीएमसी पॉटहोल ६८यावर नागरिकांनी तक्रारी केल्यास हा आकडा अजुनही वाढू शकतो. कोविडच्या काळात मुंबईकरांना  खड्डयांचा त्रास होवू नये आणि प्रत्येक खड्डा २४ ते ४८ तासांमध्ये बुजवण्यासाठी महापालिकेने हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला असला तरी पॉटहोल ट्रॅकींग सिस्टीमचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. ज्याद्वारे प्रशासनाना अचुक रस्त्यांवरील खड्डा वेळीच बुजवल्यामुळे विरोधकांच्या आरोपांचे धनी होता येणार नाही.


हे ही वाचा – सुशांत आत्महत्या प्रकरण: संजय लिला भन्साळी यांची ३ तास कसून चौकशी!


 

First Published on: July 6, 2020 9:59 PM
Exit mobile version