बुलेट ट्रेनसाठी जमीन मोजणीचे पालघरमधील काम पूर्ण

बुलेट ट्रेनसाठी जमीन मोजणीचे पालघरमधील काम पूर्ण

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी जनसुनावणीला तीव्र विरोध सुुरू असताना वसईत भूसंपादनासाठी मोजणीचे काम पूर्ण झाल्याचा दावा प्रकल्प अधिकार्‍यांनी केला आहे.

एकीकडे मोजणीचे काम पूर्ण झाले असून आता मोबदला देण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी आता जिल्ह्यात जनसुनावणी घेण्यास सुरुवात झाली आहे. वसई आणि पालघर येथे झालेल्या जनसुनावणीला काही संघटना आणि शेतकर्‍यांनी तीव्र विरोध केल्याने सुनावणी गुंडाळावी लागली होती. त्यामुळे शेतकरी मोबदला घेतील काय आणि भूसंपादन करणे तितकेसे सोपे असेल का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

508.17 किमी लांबीच्या या बुलेट ट्रेनचा मार्ग महाराष्ट्र, गुजरात या दोन राज्यांबरोबरच दादरा-नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशातूनही जाणार आहे. महाराष्ट्रातील या मार्गाची लांबी एकूण 155.64 किमी एवढी असून विरार आणि बोईसर हे पालघर जिल्ह्यातील थांबे आहेत. एकूणच बीकेसीपासून ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरुच, बडोदा, आणंद, नदिया, अहमदाबाद, साबरमती अशी तब्बल 12 स्थानके आहेत. पालघर जिल्ह्यातील एकूण 73 गावातून हा प्रकल्प जात असून, यामध्ये वसईच्या 21 गावांचा सुद्धा समावेश आहे. बुलेट ट्रेन मार्गावरील प्रत्येक स्थानक त्या भागातील

मेट्रो, बस, टॅक्सी आणि खासगी वाहने तसेच सध्याची रेल्वे स्थानके यासारख्या वाहतुकीच्या साधनांशी जोडलेले असेल.वसई व्यतिरिक्त पालघरमध्ये सुद्धा सध्या स्थितीमध्ये 73 गावांपैकी 62 गावांमध्ये शेतकर्‍यांच्या व भूधारकांच्या संमतीने जमिनीची संयुक्त मोजणी (जेएमएस) करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी पालघर जिल्ह्यातील एकूण 288 हेक्टर खासगी जमीन संपादित केली जाणार आहे.

अशा आहेत बुलेट ट्रेन्स
सुमारे 508.17 किमी लांबीच्या या बुलेट ट्रेनच्या मार्गावर 1300 ते 1600 प्रवासी एकावेळी 10 डब्यांमधून प्रवास करतील. बुलेट ट्रेन दोन प्रकारची असेल. एक अतिजलद आणि दुसरी जलद. अतिजलद बुलेट ट्रेन 12 स्थानकांदरम्यान फक्त सुरत, बडोदा, अहमदाबाद या स्थानकांवरच थांबेल आणि मुंबई-अहमदाबाद हे अंतर अवघ्या दोन तास सात मिनिटांत पार करेल. जलद बुलेट ट्रेन सर्वच स्थानकांवर थांबून मुंबई-अहमदाबाद हे अंतर दोन तास 58 मिनिटांत पूर्ण करेल. ताशी 320 ते 220 किमी असा वेग असलेली बुलेट ट्रेन सुरुवातीच्या टप्प्यात काही ठिकाणी जमीन आणि पाण्याखालून जाणार आहे. तर उर्वरित टप्प्यात बुलेट ट्रेन उन्नत मार्गाने जाणार आहे. या ट्रेनमुळे फक्त प्रवास जलद होणार नसून प्रत्येक स्थानकाबाहेर आणि त्या त्या भागाचे शहरीकरण होणार आहे.

बुलेट ट्रेन मार्गावरील प्रत्येक स्थानक त्या भागातील मेट्रो, बस, टॅक्सी आणि खासगी वाहने तसेच सध्याची रेल्वे स्थानके यासारख्या वाहतुकीच्या साधनांशी जोडलेले असेल. याबरोबरच स्थानकांवर प्रतिक्षालय, दुकाने आणि रेस्टॉरंट, पर्यटक माहिती केंद्रे आणि बॉक्स लंच स्टँड सारख्या सुविधा असतील. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक स्थानकाच्या प्रवेशद्वाराला विमानतळांवरील सुरक्षेप्रमाणे सुरक्षा द्वारे (सेफ्टी गेट्स) उभारली जातील.

First Published on: November 25, 2019 6:13 AM
Exit mobile version