कसली डोंबल्याची सुरक्षा? हाय सेक्युरिटी असलेल्या मंत्रालयातही झाली चोरी!

कसली डोंबल्याची सुरक्षा? हाय सेक्युरिटी असलेल्या मंत्रालयातही झाली चोरी!

आमदारांच्या स्थानिक विकास निधीत एक कोटींची वाढ

मंत्रालयीन कामकाजासाठी मागवण्यात आलेल्या संगणकांपैकी एका संगणक चोरीला गेल्याच्या प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. मंत्रालयाच्या पॅन्ट्री हाऊसमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. २४ तास पोलिसांचा कडक पहारा असताना मंत्रालयात झालेल्या चोरीप्रकरणी येथील सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघाले आहे. मंत्रालयातील गृहनिर्माण विभागाने केंद्र सरकारचे जी.एम. पोर्टल द्वारे मंत्रालयीन कामकाजाकरीता १५ संगणकांची खरेदी करण्यात आली होती. परफेक्ट हाउस या संगणक वितरकाने डेल कंपनीचे १५ संगणक २१ जानेवारी रोजी मंत्रालयाच्या गृहविभागात पोहोचवले होते. यातलाच एक संगणक चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे.

कशी झाली चोरी?

हे सर्व संगणक या विभागातील अधिकारी अक्षय चोले यांनी स्वतःच्या ताब्यात घेऊन सर्व नवीन संगणक संबंधित विभागाच्या पॅन्ट्री हाऊस मध्ये ठेऊन दिले होते. १५ संगणकांपैकी १० संगणक टप्प्याटप्प्याने गृहनिर्माण विभागात वाटप केले होते. उर्वरित ५ संगणक पॅन्ट्री हाऊसमध्ये ठेऊन पॅन्ट्री हाउसला कुलूप लावण्यात आले होते. घरी जाताना या पॅन्ट्री हाऊसची चावी मंत्रालयात जमा करण्यात येते. १० सप्टेंबर रोजी गृहनिर्माण विभागातील कर्मचाऱ्यांनी या विभागाचे अधिकारी अक्षय चोले यांच्याकडे नवीन संगणकाची मागणी केली असता पॅन्ट्री हाऊस मध्ये पाच संगणकांपैकी एका संगणकाचा रिकामा बॉक्स आढळला. त्यातला संगणक गायब होता!

चोले यांनी संगणकाबाबत विभागात शोधाशोध केली. मात्र तो कुठेच सापडला नाही. अखेर चोले यांनी ही बाब आपले वरिष्ठांच्या कानावर घालून संपूर्ण विभागात चोरीला गेलेल्या संगणकाचा शोध घेण्यात आला. मात्र संगणक कुठेच सापडला नसल्यामुळे अखेर मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून मंत्रालयातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयिताचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मंत्रालयाच्या सुरक्षेचे वाभाडे!

लॉकडाऊन लागू होण्यापूर्वी हे सर्व संगणक मागवण्यात आले होते. लॉकडाऊनच्या काळातच या संगणकाची चोरी झाली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मंत्रालयात २४ तास पोलिसांचा कडक पहारा असून येथील सुरक्षा व्यवस्था भेदून चोरट्याने नवाकोरा संगणक चोरी केल्यामुळे येथील सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघाले आहे.

First Published on: September 16, 2020 11:56 PM
Exit mobile version