बंदोबस्तावरील पोलिसांसाठी एक किचन संकल्पना

बंदोबस्तावरील पोलिसांसाठी एक किचन संकल्पना

Police

मतदानाच्या दिवशी बंदोबस्तावर असणार्‍या पोलिसांच्या जेवणाची आबाळ होऊ नये म्हणून मुंबई पोलीस आयुक्तांनी संपूर्ण मुंबईत ‘एक किचन संकल्पना’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. याची सर्वस्व जवाबदारी सहपोलीस आयुक्त (प्रशासन) आणि पोलीस उपायुक्त (मुख्यालय) यांच्याकडे असणार आहे. या संकल्पनेमुळे पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या डोक्यावरील भार कमी होणार असून, मतदानाच्या आदल्या दिवसापासून बंदोबस्तावर असणार्‍या पोलिसांना वेळेवर जेवण आणि नास्ता उपलब्ध होणार आहे.

निवडणूका म्हटले तर सर्वात अधिक ताण पोलिसांवर असतो. निवडणुकीच्या काळात तसेच मतदानाच्या दिवशी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना सतर्क रहावे लागते. त्यामुळे वेळेवर जेवण न मिळणे, अर्धवट झोप यातून पोलिसांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते. मतदानाच्या आदल्याच दिवशी बंदोबस्तावर असणार्‍या पोलिसांची राहण्याची, त्यांच्या जेवणाची सोय स्थानिक पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला करावी लागत होती. त्याचबरोबर आपल्या हद्दीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची जबाबदारी वरिष्ठ निरीक्षकावर असते. या सर्व जबाबदार्‍या सांभाळता सांभाळता वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची तारांबळ उडत असते. त्यामुळे बंदोबस्तासाठी बाहेरून येणार्‍या पोलीस कर्मचारी तसेच अधिकारी यांच्या जेवणाची आबाळ होत होती.

परंतु या वेळी मतदानाच्या दिवशी बंदोबस्तावर असणार्‍या पोलीस कर्मचारी तसेच अधिकार्‍यांना वेळेवर आणि जागेवर उत्कृष्ट दर्जाचे जेवण आणि शुद्ध पाणी कसे देता येईल यावर मुंबई पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत चर्चा करून ‘एक किचन संकल्पना’ राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी प्रत्येक अप्पर पोलीस आयुक्त आपल्या कार्यक्षेत्रात येणार्‍या प्रत्येक पोलीस ठाण्याकडून बंदोबस्तावर असणार्‍या, तसेच बाहेरून बंदोबस्तासाठी येणार्‍या पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍याची माहिती मागवून ती मुख्यालय येथे पाठवली जाणार आहे. संपूर्ण मुंबईत बंदोबस्तासाठी असणार्‍या पोलिसांसाठी जेवणाची सोय करण्यासाठी एकत्रित जेवण, नास्ता तयार करून जेवणाचे डबे आणि नास्ता त्याचसोबत शुद्ध पाण्याची बॉटल बंदोबस्तावर असणार्‍या पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍यांना वेळेवर पोहचविण्याची व्यवस्था कऱण्यात येणार आहे. प्रत्येक दिवसाचा जेवणाचा आणि नाश्त्याचा मेनू ठरवण्यात येत असून ही सर्वस्वी जबाबदारी सहपोलीस आयुक्त (प्रशासन) आणि पोलीस उपायुक्त (मुख्यालय) यांच्याकडे सोपवण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मुंबईत मतदानाच्या आदल्या रात्री बंदोबस्तावर असणार्‍या पोलीस कर्मचारी आणि अधिकार्‍यांना जेवण त्यासोबत शुद्ध पाण्याची पॅकबंद बॉटल, दुसर्‍या दिवशी सकाळी चहा नास्ता,पाण्याची बॉटल, दुपारचे जेवण, पाणी बॉटल,संध्याकाळी चहा नाश्ता आणि रात्रीचे जेवण हे वेळेवर देता येईल, अशी व्यवस्था कऱण्यात येणार असल्याचे समजते.

First Published on: April 24, 2019 4:10 AM
Exit mobile version