बोरिवलीच्या भगवती रूग्णालयात करोना चाचणी करा – काँग्रेसची मागणी

बोरिवलीच्या भगवती रूग्णालयात करोना चाचणी करा – काँग्रेसची मागणी

एकीकडे मुंबईतल्या करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच दुसरीकडे करोनासंदर्भातल्या चाचण्या करणाऱ्या लॅब्ज मर्यादित असल्यामुळे आणि त्याची किंमत जास्त असल्यामुळे आता मुंबईच्या उपनगरांमध्ये स्वतंत्र करोना चाचणी सुविधेची मागणी पुढे आली आहे. मुंबई प्रदेश काँग्रेसचे सचिव धनंजय जुन्नरकर यांनी ही मागणी केली आहे. मागणी करण्यासाठी त्यांनी नियमित पद्धतीप्रमाणे प्रत्यक्ष जाऊन निवेदन न देता लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर इमेल पाठवला आहे. तसेच, करोना चाचणीची किंमत पाहाता सामान्य माणसाला ती कशी परवडेल? असा सवाल देखील त्यांनी या मेलमध्ये केला आहे.

चाचणीसाठी २५ हजार कसे देणार?

यासंदर्भात त्यांनी मुंबई शहर आणि उपनगरांची तुलनाच मांडली आहे. मुंबई शहराची लोकसंख्या ४० लाख आहे, तर उपनगरांची लोकसंख्या ६५ लाख आहे. मात्र, असं असताना देखील करोनाच्या टेस्टसंदर्भातली सर्व हॉस्पिल्स किंवा केंद्र ही मुंबई शहरमध्ये आहेत. त्यामुळे उपनगरांतल्या नागरिकांसाठी टेस्टची वेगळी व्यवस्था करणं आवश्यक आहे. याशिवाय करोनाच्या चाचणीसाठी ४५०० रुपये मूल्य ठरवण्यात आलं आहे. पण घरात सामान्यपणे ४ ते ५ माणसं असतात. एकाला सर्दी-खोकला झाला आणि सगळ्यांची चाचणी करायची झाली, तर २५ हजार रुपये देणं कसं शक्य होणार? असा सवाल धनंजय जुन्नरकर यांनी केला आहे.

मोकळ्या इमारतींचा वापर करा

दरम्यान, या मेलमध्ये त्यांनी उपनगरांमधल्या कोणत्या ठिकाणांचा वापर करोनाच्या चाचणी आणि उपचारांसाठी करता येऊ शकेल, याचे पर्याय देखील दिले आहेत. बोरीवली पश्चिममधलं पालिकेचं भगवती रुग्णालय बांधून तयार आहे. पण तिथे फक्त सर्दी-तापाची ओपीडी चालते. १५ ते १६ मजल्यांची इमारत मोकळी आहे. शिवाय, दहिसर पश्चिमेकडची रुस्तमजीची पालिकेच्या प्रसुती गृहासाठी बांधलेली १०० खाटांची इमारत देखील बंद अवस्थेत आहे. या इमारतींचा करोनाच्या चाचणी आणि उपचारांसाठी वापर करता येईल, असं देखील त्यांनी या मेलमध्ये म्हटलं आहे.

डॉक्टरांची समान पद्धतीने नियुक्ती हवी

याशिवाय, मेलमध्ये तिसरा मुद्दा डॉक्टरांचा उपस्थित करण्यात आला आहे. पालिकेकडू प्रत्येक प्रभागासाठी काही डॉक्टरांची नियुक्ती केली आहे. पण काही प्रभागात एक तर काही प्रभागांत तीन तीन डॉक्टर्सची नियुक्ती झाली आहे. ती समान प्रमाणात करावी आणि झोपडपट्टीत करोनाचा अधिक धोका असल्यामुळे तिथे जादा डॉक्टर नेमण्यात यावेत, असं देखील धनंजय जुन्नरकर यांनी नमूद केलं आहे.


CoronaVirus: देशात ३५ खासगी लॅब्सला करोना चाचणीची परवानगी, मुंबईत ५, महाराष्ट्रात ९ लॅब्ज
First Published on: March 27, 2020 11:41 AM
Exit mobile version