मुंबई काँग्रेसमध्ये धुसफूस; निरुपम हटावची मागणी?

मुंबई काँग्रेसमध्ये धुसफूस; निरुपम हटावची मागणी?

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस एकीकडे महाआघाडीची तयारी करत असतानाच मुंबई काँग्रेसमध्ये मात्र धुसफूस वाढत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. मुंबई अध्यक्षाविरोधात सध्या मुंबई काँग्रेसमध्ये दोन गट पडले असून, आधीपासूनच निरुपम यांच्यावर नाराज असलेला कामत गट आता त्यांच्या अकाली निधनाने चिंतेत आला आहे. निरुपम यांना मुंबई अध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे केल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे निरुपम हटावची मागणी जोर धरू लागल्याची माहिती काँग्रेसच्या आतील सूत्रांकडून मिळत आहे.

या नेत्यांनी घेतली खर्गेंची भेट

काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान, सुरेश शेट्टी, एकनाथ गायकवाड, जनार्दन चांदूरकर, भाई जगताप आणि गुरुदास कामत गटाच्या अनेक नेत्यांनी आज खर्गे यांची हॉटेल ताज लँड्स एन्डला येथे भेट घेतली. निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना अध्यक्ष करण्याची मागणी यावेळी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

कामत गट निरुपम यांच्यावर नाराज

गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्यातील वाद सगळ्यांना माहीत आहेत. ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर कामत आणि निरुपम यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले होते. संजय निरुपम यांच्यामुळे कामत यांनी काँग्रेसच्या पदांचा राजीनामा दिला होता. मात्र नुकतेच कामत यांचे निधन झा्ल्याने त्यांचे कार्यकर्ते निरुपम यांच्यासोबत काम करायला तयार नाहीत. त्यामुळे कामत गटाला पक्षात थांबवण्यासाठी फेरबदलाची मागणी करणे आवश्यक असल्याचे काँग्रेस नेत्यांनी खर्गे यांना सांगितले असल्याचे कळते.

आम्ही खर्गे साहेबांना भेटून सांगितले की, गुरुदास कामत यांच्या जाण्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढायची असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे त्यासाठी अध्यक्ष राहुल गांधी जे नेतृत्व देतील त्याच्या हाताखाली आम्ही काम करू. राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधीच यावर निर्णय घेतील. – आमदार जनार्दन चांदुरकर (मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष)

First Published on: September 16, 2018 8:12 PM
Exit mobile version