मुंबईत आतापर्यंत ६ पोलिसांचा कोरोनाने घेतला बळी; आज आणखी एका पोलिसाचा मृत्यू

मुंबईत आतापर्यंत ६ पोलिसांचा कोरोनाने घेतला बळी; आज आणखी एका पोलिसाचा मृत्यू

प्रातिनिधिक छायाचित्र

कोरोना व्हायरसने मुंबईत थैमान घातले असताना त्याचा कहर पोलीस खात्यावर देखील दिसत आहे. आज मुंबई पोलीस दलातील आणखी एका शिपायाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील शिवाजी नगर पोलीस ठाण्यातील शिपाई यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दोन आठवड्यापूर्वी त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. या मृत्यूमुळे आता मुंबईतील पोलिसांच्या मृत्यूचा आकडा ६ वर पोहोचला असून राज्यात आतापर्यंत ९ पोलिसांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई मिरर या वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार शिवाजी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुदर्शन पैठणकर यांनी सांगितले की, “मृत्यू झालेले ४५ वर्षीय पोलीस शिपाई भगवान पार्टे यांची ड्युटी गस्तीच्या वाहनावर लावली होती. ३० एप्रिल रोजी त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून लागल्यामुळे ते सुट्टीवर गेले होते. दोन दिवसांनी त्यांचा कोविड टेस्टची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. सुरुवातील त्यांना पनवेल येथील खासगी रुग्णालयात उचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यानंतर कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.”

पार्टे यांच्यासोबत त्यांच्या पत्नीचीही टेस्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांच्यावर देखील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जाते. पार्टे यांच्या पश्चात त्यांची पत्नी आणि एक मुलगा – एक मुलगी असा परिवार आहे. पार्टे शिवाजी नगर येथे गस्तीवर ड्युटी देत होते. मुंबईतील शिवाजी नगर हा कोरोनाचा हॉटस्पॉट असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान महाराष्ट्रात तब्बल १००१ पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती गृहखात्याने दोन दिवसांपूर्वी दिली होती. त्यापैकी ४४० रुग्ण हे मुंबई पोलिस दलातील आहेत. राज्य सरकारने याआधीच कोरोनामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत करणार असल्याचे जाहीर आहे.

First Published on: May 14, 2020 5:15 PM
Exit mobile version