मानवतावाद्यांचे प्रतिक डॉ. आंबेडकर झालेत

मानवतावाद्यांचे प्रतिक डॉ. आंबेडकर झालेत

प्रजासत्ताकदिनी युवा क्रांती सभा आयोजित ८ वी “संविधान हक्क परिषद” विश्वशांती बुद्ध विहार, मालाड मालवणी येथे यशस्वीपणे पार पडली. परिषदेत रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर हे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार हुसेन दलवाई हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आनंदराज आंबेडकर अध्यक्षीय भाषणात म्हणाले की महासत्ता होणारा आपला देश सध्या कंगालांच्या यादीत गेला असून हे आर्थिक अपयश लपविण्यासाठी नागरिकत्वाचा मुद्दा पुढे करण्यात आलाय. त्यानुसार आसाम मध्ये घुसखोर ठरवले गेलेले १३ लाख लोक हे आदिवासी,दलित आणि बहुजन आहेत. सीएए, एनआरसीला सर्व स्तरांमधून विरोध होतो आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे या विरोधाचे प्रतीक म्हणून समोर येत आहेत.त्यामुळे सर्व मानवतावादयांचे प्रतिक आज डॉ बाबासाहेब आंबेडकर झालेत, असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.

हुसेन दलवाई आपल्या भाषणात म्हणाले की बाबासाहेबांची घटना नेस्तनाबूत करून मनुस्मृती परत आणून पेशवाई निर्माण करण्याचं कारस्थान केंद्र सरकार करत आहे. हा नवीन कायदा फक्त मुसलमान विरोधी नाही तर देशातल्या सर्व गरीब, आदिवासी, दलित, शोषित यांच्या विरोधातला हा कायदा आहे. तर पुण्यातील पेशवाई दिल्लीत जाऊन मजबूतपणे सत्तेत बसली आहे व ती एक बलाढ्य शत्रू म्हणून आज आपल्यासमोर उभी आहे. आपण या बलाढ्य शत्रूचा पराभव रस्त्यावरच्या लढाईत करू शकत नाही, कारण त्यांच्याकडे पोलीस, निमलष्करी दल व मिलिटरी आहे, असे प्रतिपादन प्रा. श्रावण देवरे यांनी केले.

या परिषदेत साहित्यिका उर्मिला पवार, मुफ्ती इमानउल्लाह, विशाल हिवाळे, अपरान्त कांबळे, स्वप्निल नांदिवडेकर यांनी आपल्या भाषणात सीएए, एनआरसी, एनपीआरला कडाडून विरोध केला.परिषदेची सुरुवात भारतीय संविधानाच्या शपथेने आणि सांगता राष्ट्रगीता ने करण्यात आली. हि परिषद यशस्वी करण्यासाठी परिषदेचे निमंत्रक, सुरेश कांबळे, रामदास भैसरे,निसार अली, अड शेख सय्यद, सब्बाउद्दीन खान, विकास वाघमारे, अड प्रमिला गायकवाड, सलीम पटेल राजू मानमोटे, वॉल्टर डिसोजा, सुमन कडलक आदींनी परिश्रम घेतले. मालाड- मालवणी मधील सर्व संविधानवादी संस्था, संघटना, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने या परिषदेत सहभागी झाले होते.

First Published on: January 29, 2020 2:13 AM
Exit mobile version