शहरी ग्राहकांची दूध संघाकडून लूट

शहरी ग्राहकांची दूध संघाकडून लूट

शेतकर्‍यांना दुधाच्या दरात वाढ द्यायचे कारण देत विविध दूधसंघ शहरी ग्राहकांच्या खिशाला हात घालतात, परंतु शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या दुधाच्या दरात कपात केल्यानंतर त्याचा लाभ शहरी ग्राहकांना देण्याकडे दूध संघ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. महाराष्ट्रातील महत्त्वाचा दूध संघ असलेल्या गोकुळने काही महिन्यांपूर्वी शेतकर्‍यांना दुधाचे दर वाढवून देण्यासाठी शहरी ग्राहकांचे दूध दोन रुपयांनी महाग केले. मात्र, 15 दिवसांपूर्वी शेतकर्‍यांच्या दुधाच्या दरात दोन ते तीन रुपयाने कपात केली. मात्र, त्याचा फायदा दूध संघाने शहरी ग्राहकांना न देता स्वत:च मटकावला असल्याचा आरोप कष्टकरी शेतकरी संघटनेने केला आहे.

दुधाच्या भुकटीचे दर घसरल्यामुळे दुधाला दर देणे परवडत नाही, असे कारण दूध संघांकडून दिले जात होते. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी यांनी दूध दरवाढीसाठी राज्यव्यापी आंदोलन केले होते. त्यावेळी गायीच्या दुधाचा दर 25 रुपये लिटर असा ठरवून देण्याबरोबरच पाच रुपये अनुदान देण्याचेही राज्य सरकारने मान्य केले होते. त्यानंतर गोकुळ डेरीतर्फे कोल्हापूर जिल्ह्यात 25 रुपये तर बाहेरच्या दुधाला 23 रुपये दर आकारण्यात आला. यासाठी दुधाच्या विक्रीत दोन रुपये वाढ केली, तसेच दूध भुकटीचे दरही 125 ते 150 रुपयांवरून 225 रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे 15 दिवसांपूर्वीच गोकुळने दुधाच्या दरात कोल्हापूरमध्ये दोन रुपयांनी कपात करून तो 23 रुपये तर जिल्ह्याबाहेरील दुधाच्या दरात तीन रुपयांनी कपात करून तो 20 रुपये केला. मात्र, 15 दिवस उलटले तरी शहरी ग्राहकांच्या किमान दुधाच्या विक्रीमध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे गोकुळकडून शहरी ग्राहकांची लूट करण्यात येत असल्याचा आरोप जनता दल व कष्टकरी शेतकरी संघटनेकडून केले आहे.

शहरी ग्राहकांची लूट थांबविण्यासाठी गोकुळने दुधाच्या विक्रीच्या दरात त्वरित कपात करावी, अशी मागणी जनता दलाचे प्रदेश उपाध्यक्ष व कष्टकरी शेतकरी संघटनेचे नेते विठ्ठल लाड आणि मुंबई जनता दलाचे अध्यक्ष प्रभाकर नारकर यांनी केली आहे.

First Published on: March 12, 2019 4:31 AM
Exit mobile version