कूपर हॉस्पिटल रॅगिंग – दोषी विद्यार्थ्यांना अखेर शिक्षा

कूपर हॉस्पिटल रॅगिंग – दोषी विद्यार्थ्यांना अखेर शिक्षा

कूपर रुग्णालय

नायर हॉस्पिटलमध्ये झालेल्या रॅगिंग प्रकरणानंतर आता कूपर हॉस्पिटलमध्ये झालेलं रॅगिंग तक्रार प्रकरण गाजत आहे. कूपर हॉस्पिटल आणि महाविद्यालयातील ४० प्रतिनिधींनी प्रशासनाकडे केलेल्या रॅगिंगच्या तक्रारीनंतर पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये रॅगिंग अजूनही होत असल्याचं समोर आलं आहे. कूपर हॉस्पिटलमध्ये झालेल्या रॅगिंग प्रकरणाबाबत रॅगिंगविरोधी समितीने तपास केल्यानंतर गुरुवारी सादर करण्यात आलेल्या अहवालात एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्गातील दोन विद्यार्थी दोषी आढळून आले आहेत. या दोन्ही विद्यार्थ्यांनी शारिरीक त्रास दिला नसला तरीही मानसिक त्रास दिल्याचे नमूद करण्यात आले आहे. म्हणून या दोन्ही विद्यार्थ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी वसतिगृहातून काढून टाकण्यात आले आहे. शिवाय या दोन्ही विद्यार्थ्यांच्या पालकांना लेखी स्वरुपात कळवण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांकडून दुसऱ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांची रॅगिंग झाल्याची तक्रार ४० विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे केली. पालिकेच्या कूपर हॉस्पिटलसोबत संलग्न असलेल्या बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयातील पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शुक्रवारी रात्री दुसऱ्या वर्षाचे पाच ते सहा विद्यार्थी शिरले. त्यांनी पहिल्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना जर्नल्स पूर्ण करण्यासाठी दबाव टाकला. शिवाय डांबूनही ठेवले अशी तक्रार तब्बल ४० विद्यार्थांनी महाविद्यालयाच्या अधिष्ठातांकडे केली. त्यानंतर प्रशासनाने रॅगिंगविरोधी समितीकडे ही तक्रार पाठवली. या समितीचा अहवाल गुरुवारी सादर करण्यात आला आहे. या प्रकरणात दुसऱ्या वर्षाचे दोन विद्यार्थी दोषी आढळून आले असून या दोन विद्यार्थ्यांना तीन महिन्यांसाठी वसतिगृहातून काढून टाकण्यात आले असल्याचे महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पिनाकिन गुज्जर यांनी सांगितले.

First Published on: December 26, 2019 10:27 PM
Exit mobile version