पोलिस हवालदाराला हवे सहकुटुंब इच्छामरण!

पोलिस हवालदाराला हवे सहकुटुंब इच्छामरण!

प्रातिनीधिक फोटो

मरोळ सशस्त्र दलात कार्यरत असलेल्या ज्ञानेश्वर अहिरराव या पोलिसाने त्याचे वेतन न काढल्याने सरकारी गणवेशात भीक मागण्याची वरिेष्ठांकडे परवानगी मागण्याचे प्रकरण ताजे असतानाच पोलीस दलातल्याच वरळी विभागात कार्यरत असलेल्या सुनिल टोके या पोलीस हवालदारानेही वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून स्वत:सह कुटुंबाला इच्छामरण देण्याची मागणी केली आहे.

या मागणीचे निवेदन टोके याने राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांना दिले आहे. त्याच्या या मागणीमुळे पोलीस दलात खळबळ उडाली असून यानिमित्ताने पोलीस दलात वरिष्ठांकडून कनिष्ठांचा होणारा छळ चव्हाट्यावर आला आहे.

सुनिल टोके याने १४ मे रोजी इच्छामरणाचे पत्र दिले आहे. टोके हृदयविकाराचे रुग्ण आहेत. तसेच मूत्रपिंडाच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांना आठवड्याला दोन वेळा डाएलिसीस करावे लागते. शिवाय मधुमेहाने त्यांना ग्रासले आहे. इतके गंभीर आजार असूनही वरीष्ठ मात्र त्यांची दखल घेत नाहीत, आपल्यावर खोटारडेपणाचे आरोप करतात, अशी त्यांची तक्रार आहे. आपले वरीष्ठ आणि वरळी विभागाचे वरीष्ठ निरीक्षक प्रफुल्ल फडके तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांच्याकडून आपला छळ होत असल्याचा गंभीर आरोप टोके यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.

पोलिसांच्या वाहतूक शाखेत कसा भ्रष्टाचार होतो हे टोके यांनी २०१६मध्ये पुराव्यांसह बाहेर काढले होते. शासकीय निवासस्थाने पोलिसांना देतानाही दलात घोटाळा होत असल्याबाबत २०१८ साली त्यांनी उच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. त्याआधी त्यांनी ही प्रकरणे वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तसेच पोलीस आयुक्तांकडेही नेली होती. ही भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढल्याचे बक्षीस म्हणून कौतुक होण्याऐवजी टोके यांचा छळ सुरू झाला. तत्पूर्वी टोके यांनी गोरेगाव आणि आताच्या दिंडोशी वाहतूक शाखेत काम करताना वरीष्ठ कनिष्ठांना पैसे कसे जमा करायला लावतात, याबाबतचे पुरावे सादर केले होते. त्यावरही कारवाई झाली नाही.

वरील सगळी प्रकरणे आपल्या अंगलट येतील हे लक्षात घेऊन वरीष्ठ अधिकारी आपल्या जीवावर उठले आहेत. येनकेन प्रकारेन आपल्याला त्रास देत आहेत, असे टोके यांचे म्हणणे आहे. यातूनच टोके यांना वरळी येथील पोलीस वसाहतीतील राहत्या घरातून बाहेर काढण्याचे अधिकाऱ्यांचे उपदव्याप सुरू आहेत. टोके गंभीर आजारी असूनही उपचार घेतल्याची कागदपत्रे हे अधिकारी खोटी ठरवत आहेत. त्यांची प्रिस्क्रिप्शनही बोगस असल्याची शेरेबाजी करतात. डॉक्टरांनी केलेल्या निदानावर संशय घेत अधिकारी मानसिक त्रास देत असल्याची तक्रार टोके यांनी आपल्या इच्छामरणाच्या निवेदनात केली आहे.

मुकुंद लांडगे

First Published on: May 17, 2018 10:32 AM
Exit mobile version