Coronavirus: दिलासादायक! मुंबईतील दाटीवाटीच्या झोपडपट्टीत कोरोना येतोय नियंत्रणात

Coronavirus: दिलासादायक! मुंबईतील दाटीवाटीच्या झोपडपट्टीत कोरोना येतोय नियंत्रणात

Coronavirus: दिलासादायक! मुंबईतील दाटीवाटीच्या झोपडपट्टीत कोरोना येतोय नियंत्रणात

मानखुर्द-शिवाजीनगर आणि अणुशक्तीनगर या दोन विधानसभा क्षेत्र मोडणाऱ्या एम-पूर्व विभागात सुरुवातीला वाढलेला कोरोनाचा संसर्ग पाहता प्रशासनाच्या उरात धडकी भरली होती. परंतु अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या येथील देवनार, चिता कॅम्प, शिवाजीनगर, गोवंडी, मानखुर्द आदी भागांमध्ये सध्या हा आजार काही प्रमाणात नियंत्रणात येताना दिसतोय. ही बाब संपूर्ण मुंबईसाठी दिलासादायक मानली जात आहे. सध्या या दोन्ही विधानसभा क्षेत्रांमध्ये रुग्ण दरवाढीचे प्रमाण हे १.८ टक्के एवढे आहे. मात्र,अंगणात शताब्दी अर्थात पंडित मदनमोहन मालवीय रुग्णालय आहे. परंतु सुरुवातीपासून याठिकाणी कोविडच्या रुग्णांसाठी खुले न केल्याने लोकांची मोठी गैरसोय झाली. परंतु आता हे रुग्णालय कोविडसाठी करून त्याठिकाणी ऑक्सिजन रुपांतरीत बेडची व्यवस्था केली तरी चिंताजनक झालेल्या रुग्णाला राजावाडी नाही तर शीव रुग्णालयात किंवा खासगी रुग्णालयातच दाखल करण्यासाठी धावाधाव करावी लागते.

महापालिकेच्या एम-पूर्व विभागात सध्या २३२१ एवढे रुग्ण असून १५०हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधित झालेल्या या रुग्णांपैकी ११५८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सध्या १०६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. हिरानंदानी लल्लूभाई रोड, नटवर पारेख कंपाऊंड, बैंगनवाडी कमला रामन नगर, लोटस कॉलनी, टाटा नगर, मोची गल्ली, सोनापूर रोड, डंम्पिंग रोड, देवनार, गौतम नगर, निमोणी बाग, अण्णासाठे नगर, गोवंडी,चित्ता कॅम्प आदी परिसरांमध्ये रुग्ण आढळून आले. परंतु अत्यंत दाटीवाटीने वसलेल्या आणि गलिच्छ वस्तींचा भाग म्हणून प्रसिध्द असलेल्या या भागातून रुग्ण बरे होऊन घरी परततात तसेच तेथील आजार नियंत्रणात येत आहे, ही प्रशासनासाठी जमेची बाजू आहे.

एका बाजूला दाटीवाटीने वसलेली झोपडपट्टी आणि दुसऱ्या बाजूला अनेक विकासकामांच्या प्रकल्पांमध्ये बाधित झालेल्या कुटुंबांच्या पुनर्वसन येथील एमएमआरडीएने बांधलेल्या काही इमारतींमध्ये करण्यात आले. या प्रकल्पबाधितांच्या इमारतींमध्ये बहुतांशी झोपडपट्टींमधील कुटुंबेच राहत आहे. त्यामुळे झोपडपट्टीसह प्रकल्पबाधितांच्या इमारतींमध्येही तेवढीच महत्वाची काळजी घेणे प्रशासनासाठी आव्हानच होते. परंतु कोरोनाचा स्फोट होण्यापूर्वीच येथील रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्तांनी या विभागाला दिलेली भेट ही महत्वाची होती.

विशेष म्हणजे या भागातून स्थलांतरीत कामगार मोठ्याप्रमाणात गावी गेल्याने प्रशासनावरील आणि पर्यायाने लोकप्रतिनिधींवरील ताण कमी झालेला आहे. मात्र, एम-पूर्व विभागातील रुग्णवाढीचा दर अन्य वॉर्डाच्या तुलनेत कमी असल्याने सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरताना दिसत आहे.

या प्रभागात बाधित रुग्ण नसून रुग्णवाहिकाचीच मोठी समस्या आहे. आमच्या विभागाची काळजी आम्हालाच घ्यायची आहे. त्यामुळे सुरुवातीपासून वैद्यकीय शिबिर आणि वस्त्यांसह त्यातील सार्वजनिक शौचालयांमध्ये सॅनिटायझेशन केले. आज प्रशासनही सॅनिटाझेशन करत आहे. परंतु सार्वजनिक शौचालयांमध्ये प्रशासनाच्यावतीने सॅनिटायझेशन केले जात नाही. तसेच अजूनही सरकारच्यावतीने रेशन मिळाले नाही की महापालिकेच्यावतीने रेशन उपलब्ध झाले. केवळ तांदुळच प्रशासन देत असेल तर त्यांनी केवळ तांदुळच शिजवून खायचे का? ही तर गरीबांची चेष्ठाच आहे. – रुक्साना सिद्दीकी, स्थानिक नगरसेविका, समाजवादी पक्ष

आज कोरोना रुग्णांना तर उपचार मिळतच नाही. पण याबरोबरच नॉन कोरोना रुग्ण आहेत त्यांनाही उपचार मिळत नाही. त्यांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. रुग्णवाहिका नसल्याने रिक्षातून रुग्णांना नेले जाते. एवढेच नाहीतर शववाहिका नसल्यानेही रिक्षातूनच मृत व्यक्तीला घरी आणले जाते. कोरोनाबाधित रुग्णांसाठी शववाहिका उशिरा तरी प्राप्त होते. पण कोरोना नसलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यास त्यांना घरी आणताना ना रुग्णवाहिका उपलब्ध होत ना शववाहिका. महापालिका आयुक्तांनी या भागाला भेट दिली असली तरी त्यानंतर येथील परिस्थिती बदलली असे काहीही घडलेले नाही. – अख्तर कुरेशी, स्थानिक नगरसेवक, समाजवादी पक्ष

लल्लूभाई कंपाऊंड, साठेनगर, पीएमजीपी नगर आदी भागांमध्ये काही प्रमाणात कोरोनाबाधित रुग्ण आहेत. परंतु आज लोकांमध्ये कोरोनाबाबतची जराही भीती वाटत नाही किंबहुना ते काळजी घेताना दिसत नाही. लोकांच्या या बिनधास्त पणामुळेच कोरोनाचा संसर्ग होत आहे. आज ठराविक रस्त्यांवरील एक दिवस आड दुकाने सुरू ठेवली जातात. परंतु बंद दुकानांच्या बाजुने फेरीवाले बसतात आणि याच फेरीवाल्यांकडील भाजीपाला खरेदीसाठी लोक जास्त गर्दी करतात. त्यामुळे दुकानांबरोबरच फेरीवाल्यांविरोधात तेवढीच कडक कारवाई झाल्यास गर्दी कमी करण्यात यश येईल. – वैशाली शेवाळे, स्थानिक नगरसेविका, एम-पूर्व प्रभाग समिती अध्यक्ष

म्हाडा कॉलनी, मोहिते पाटील नगर, एकता नगर, जनता नगर, इंदिरा नगर, शिवनेरी नगर आदीठिकाणी कोरोनाबाधित रुग्ण असून आतापर्यंत बाधित रुग्णांचा आकडा ५०पर्यंत पोहोचला आहे. झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक शौचालयांचे सॅनिटायझेशन जर रुग्ण मिळाला तरच होतेच. पण सार्वजनिक शौचालयांमध्ये दोन ते तीन दिवसांनी सॅनिटायझेशन केले जाते. म्हाडा कॉलनीत सॅनिटायझेशन करता मशिन उपलब्ध करून दिले असून त्यांना या माध्यमातून स्थानिकांच्या तसेच कार्यकर्त्यांच्या मदतीने जंतूनाशकाची फवारणी करण्यास सांगितले. – समिक्षा सक्रे, स्थानिक नगरसेविका, शिवसेना

गव्हाणगाव, विष्णूनगर, भारत नगर, शंकर देऊळ याठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, लॉकडाऊन होण्यापूर्वीच आम्ही स्व-खर्चाने १५ मशीन्सची खरेदी करून तसेच यासाठी लागणारे हायपोक्लोराई उपलब्ध करून देत सॅनिटायझेशन महापालिकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार राबवण्यास सुरुवात केले होते. तसेच सार्वजनिक शौचालय चालवणाऱ्या संस्थांना मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लोकांनी स्वयंशिस्त पाळणेच आवश्यक असून त्यांनी एकत्र येवू नये. परंतु आज दुकानांपेक्षा भाजीपाला खरेदीलाच जास्त गर्दी होते. – निधी शिंदे, स्थानिक नगरसेविका, शिवसेना

First Published on: June 10, 2020 5:12 PM
Exit mobile version