महापालिका सुरक्षा, अग्निशमन दलाच्या २०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना

महापालिका सुरक्षा, अग्निशमन दलाच्या २०० हून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना

कोरोनाच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी पहिल्या दिवसापासून रस्त्यांवर उतरत विभाग, इमारती व कार्यालये सॅनिटाईज करणारे अग्निशमन दलाचे जवान व अधिकारी तसेच प्रत्येक रुग्णालय आणि कार्यालयांची सुरक्षा राखणाऱ्या सुरक्षा विभागाच्या जवानांसह अधिकारीही आता कोरोनाचे शिकार होवू लागले आहेत. आतापर्यंत मुंबई अग्निशमन दलाचे ९१ आणि सुरक्षा विभागाचे ११४ कर्मचारी व अधिकारी कोरोना बाधित झाले आहेत. यामध्ये मुंबई अग्निशमन दलाचे ८ व सुरक्षा विभागाचे ७ कर्मचारी व अधिकाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यानंतर पहिल्या रुग्ण आढळून आल्यापासून मुंबई अग्निशमन दलाचे जवान रस्त्यांवर उतरत विभाग आणि रस्त्यांचे सॅनिटायझेशन करत आहेत. त्यानंतर प्रत्येक रुग्ण आढळून आल्यानंतर त्या परिसराचे सॅनिटायझेशन करण्याचे काम त्यांनी सातत्याने सुरुच ठेवले होते. याशिवाय महापालिका मुख्यालय, महापालिका कार्यालये, रुग्णालये, मंडई, तसेच शासकीय कार्यालये आदींचे सॅनिटायझेशन अग्निशमनन दलाच्यावतीने करण्यात आले होते. परंतु त्यानंतर या प्रत्येक केंद्रातील जवान व अधिकाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग होवू लागला आहे. मागील आठवड्यात विलेपार्ले येथील अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू झाला. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांच्या मृत्यूचा आकडा ८ वर पोहोचला आाहे. आतापर्यंत अग्निशमन दलाच्या एकूण ९१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झालेली आहे.

तर मुंबई महापालिकेच्या सुरक्षा विभागातील बहुतांशी कर्मचाऱ्यांना रुग्णालयांची ड्युटी लावण्यात आली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सेवा देणाऱ्या सुरक्षा रक्षकांव्यतिरिक्त महापालिका मुख्यालय व इतर विभाग कार्यालयांमधील जवानांना कस्तुरबासह इतर कोरोनाचा उपचार करण्यात येणाऱ्या रुग्णालयांमध्ये सेवा घेण्यात आली. मात्र, यामध्ये केईएम रुग्णालयातील प्रमुख सुरक्षा जवानाचा मृत्यू झालेला असतानाच केईएम रुग्णालयातील आणखी एक सुरक्षा रक्षक हेमंत मुरुडकर यांचा कांदिवली शताब्दी रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सुरक्षा रक्षकांची संख्या ७ वर पोहोचली आहे. आतापर्यंत सुरक्षा विभागाचे ११४ जवान कोरोनामुळे बाधित झाले आहेत.

मुंबई अग्निशमन दल

एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या : ९१

मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या : ०८

रुग्णालयात उपचार घेणारे कर्मचारी : २२

क्वारंटाईनमध्ये दाखल कर्मचारी : २८

उपचार करून बरे झालेले कर्मचारी-अधिकारी : ३३

मुंबई महापालिका सुरक्षा दल

एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या : ११४

मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या : ०७

रुग्णालयात उपचार घेणारे कर्मचारी : ३६

क्वारंटाईनमध्ये दाखल कर्मचारी : ४५

उपचार करून बरे झालेले कर्मचारी-अधिकारी : २६

First Published on: June 17, 2020 10:01 PM
Exit mobile version