पश्चिम उपनगरात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग अधिक; वांद्रे, गोरेगाव, खार ठरताहेत हॉटस्पॉट

पश्चिम उपनगरात कोरोना रुग्ण दुपटीचा वेग अधिक; वांद्रे, गोरेगाव, खार ठरताहेत हॉटस्पॉट

Mumbai Corona Update: मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा 6 हजारांवर; बरे होणाऱ्यांचे प्रमाण घटले

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र त्यातही मुंबईच्या पश्चिम उपनगरामध्ये कोरोना रुग्ण दुपटीचा वेग अधिक असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. पश्चिम उपनगरातील वांद्रे, गोरेगाव, खार, अंधेरी, माटुंगा, मालाड व कांदिवली भागामध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत. या भागामध्ये मागील सात दिवसांमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग अधिक असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुंबई महापालिका व राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’च्या माध्यमातून कडक निर्बंध राज्यामध्ये लावले आहेत. मात्र मुंबईतील अनेक ठिकाणी नियमांचे पालन होताना दिसत नसून, नागरिक विनाकारण सर्रास रस्त्यावर फिरताना दिसत आहे. परिणामी मुंबईतील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अनेक विभाग हे सध्या कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. यामध्ये वांद्रे, गोरेगाव, खार, अंधेरी, माटुंगा, मालाड व कांदिवली या विभागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या भागामध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग अधिक आहे. मागील सात दिवसांमध्ये वांद्य्रात रुग्ण दुपटीचा कालावधी 33 दिवसांचा राहिला आहे तर गोरेगावमध्ये 38 दिवस, खार व अंधेरी 39 दिवस, माटुंगा व मालाड 41 दिवस, कांदिवलीमध्ये 42 दिवस इतका रुग्ण दुपटीचा कालावधी आहे. पश्चिम उपनगरातील या भागांप्रमाणेच मुंबई शहरातील ग्रँट रोडमधील रुग्ण दुपटीचा कालावधी 36 दिवस तर कुलाबामधील 38 दिवस आणि एल्फिन्स्टनमधील रुग्ण दुपटीचा कालावधी 42 दिवस इतका आहे. त्यामुळे पश्चिम उपनगरातील बहुतांश विभाग हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरताना दिसत आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना अधिक काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.

पश्चिम उपनगरातील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी कमी होत असताना मुंबई शहर आणि पूर्व उपनगरामध्ये मात्र रुग्ण दुपटीचा कालावधी हा फारच जास्त आहे. मुंबईमध्ये बी वॉर्ड म्हणजेच डोंगरी भागामध्ये कारोना रुग्ण दुपटीचा वेग सर्वाधिक म्हणजे 66 दिवस आहे. त्याखालोखाल टी वॉर्ड (मुलुंड) 57 दिवस, सी वॉर्ड (मरिन लाईन्स) 55 दिवस, एफ/एस वॉर्ड (परळ) 52 दिवस, एन वॉर्ड (घाटकोपर), एल वॉर्ड (कुर्ला), जी/एन वॉर्ड (दादर) 51 या विभागांमध्या रुग्ण दुपटीचा कालावधी पश्चिम उपनगरापेक्षा कमी असल्याचे पालिकेच्या डॅशबोर्डवरील माहितीवरून दिसून येत आहे.

 

First Published on: April 18, 2021 8:08 PM
Exit mobile version