कोरोना रूग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा नको – अस्लम शेख 

कोरोना रूग्णांच्या उपचारात हलगर्जीपणा नको – अस्लम शेख 

कोरोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भिती आहे. ही भीती दुर करण्यासाठी जिल्हा प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या उपाययोजनांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा तसेच जनतेचे प्रबोधन करण्यात यावे. मात्र कोणत्याही परिस्थितीत कोरोना रूग्णांच्या उपचाराबाबत हलगर्जीपणा होणार नाही, याकडे लक्ष देण्याच्या सुचना राज्याचे मत्स्यविकासमंत्री आणि ठाणे शहर संपर्क मंत्री अस्लम शेख यांनी शनिवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत केल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवरून सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, भिवंडी मनपा आयुक्त आष्टीकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांसह मनपा व अन्य विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

ठाणे जिल्हातील  कोविड-१९ वरील उपाय योजना आणि निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले विविध नुकसान इत्यादींचा आढावा घेण्यासाठी शेख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील संपूर्ण परिस्थिती व त्यांवर सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती घेत प्रशासनाला सुचना केल्या. कोणत्याही परिस्थितीत उपचाराबाबत हलगर्जीपणा होणार नाही याकडे लक्ष देण्याच्या सुचना त्यांनी केल्या. कोरोना आजाराबाबत सामान्य जनतेच्या मनात प्रचंड भिती असली तरी घाबरण्याचे कारण नाही. परंतु, आवश्यक काळजी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील उपलब्ध बेडची संख्या डँशबोर्डच्या माध्यमातून सर्व जनतेला उपलब्ध करुन द्या. आपत्ती व्यवस्थापन केंद्राकडे प्राप्त तक्रारीचे निराकरण करुन नागरिकांना दिलासा देण्याबरोबरच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यावर भर देण्यात यावा. कोरोना सारख्या जीवघेण्या आजाराला परतवून लावण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. सोशल मीडियातून चांगल्या बाबींची माहिती लोकांना द्या असेही ते म्हणाले. एखादी व्यक्ती परदेशातून आल्यानंतर त्यासाठी आयसोलेशन व क्वारंटाईन कक्ष तयार ठेवा. नव्याने उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयांमध्ये आवश्यक त्या सुविधा करण्यावर भर देण्यात याव्यात, अशा शेख यांनी केल्या. यावेळी जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या संबंधित सर्व उपाययोजनांची माहिती दिली.

First Published on: June 6, 2020 9:42 PM
Exit mobile version