Corona Update : मुंबईत कोरोना रुग्णांची होम क्वारंटाईनला पसंती!

Corona Update : मुंबईत कोरोना रुग्णांची होम क्वारंटाईनला पसंती!

काही दिवसांपासून मुंबईमध्ये सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या हजारी पार आहे. त्यामुळे पालिकेने कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज केली असली तरी कोरोनाग्रस्तांची होम क्वारंटाईनलाच पसंती असल्याचे दिसून येते. कोरोना संक्रमित रुग्णांपैकी फक्त १५० ते २०० रुग्णच रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत असून, उर्वरित रुग्ण होम क्वारंटाईन होत असल्याचे पालिकेच्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. दाखल होणार्‍या रुग्णांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याचे आढळून येत आहेत.

ऑक्टोबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान मुंबईत कोरोना रुग्णसंख्या कमी झाली होती. परंतु फेब्रुवारीपासून रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली. मुंबईत दररोज एक हजाराच्या आसपास रुग्ण सापडत आहेत. परंतु यापैकी केवळ १५० ते २०० रुग्णच पालिकेच्या कोविड केअर सेंटर्समध्ये उपचारासाठी दाखल होत आहेत. उर्वरित रुग्ण होम क्वारंटाईन होत असल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. दररोज सापडणार्‍या नवीन रुग्णांपैकी १३ ते १५ टक्के रुग्ण रुग्णालयात भरती होत आहेत. तर दररोज ४०० ते ५०० रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. अजूनही कोविड रुग्णालयांमधील ७५ टक्के खाटा रिक्त आहेत.

तसेच नवीन भरती होत असलेल्या रुग्णांमध्ये कोविडची सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. गंभीर लक्षणे आढळून येत नसल्याने ऑक्सीजनयुक्त खाटा रिक्त असल्याचे वैद्यकीय अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. कोरोनाबाबत जनजागृती, नागरिक घेत असलेली काळजी यामुळे रुग्णसंख्या तसेच होणारे मृत्यूचे प्रमाण आटोक्यात असल्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले.

पालिका आरोग्य विभागाच्या म्हणणानुसार, कोविड केअर केंद्रात आजघडीला ६१७० ऑक्सीजनयुक्त बेड, ४९८८ व्हेंटीलेटर बेड, ८७३ आईसीयू बेड रिक्त आहेत. सध्या ३५० रुग्णांची गंभीर अवस्था असून या रुग्णांवर पालिकेच्या विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

First Published on: March 3, 2021 8:40 PM
Exit mobile version