CoronaEffect: शाहीद आफ्रिदीवरून राम कदम, युवराज-हरभजन यांच्यात जुंपली!

CoronaEffect: शाहीद आफ्रिदीवरून राम कदम, युवराज-हरभजन यांच्यात जुंपली!

एकीकडे कोरोना व्हायरसशी लढा देण्यात सर्वच सरकारी संस्था, संघटना आणि वैद्यकीय विभाग प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना दुसरीकडे ट्वीटरवर मात्र सेलिब्रिटी मंडळींचं भलतंच कोरोना वॉर सुरू झालं आहे. भाजप आमदार राम कदम यांनी भारताचे माजी क्रिकेटपटून हरभजन सिंग आणि युवराज सिंग या दोघांनाही टार्गेट केलं आहे. या दोघांनी ट्वीटरवर टाकलेल्या एका व्हिडिओमुळे राम कदम यांचा संताप झाला असून त्यांनी ट्वीटरवरूनच या दोघांना सुनावलं आहे. तसंच, आपापलं ट्वीट मागे घेऊन नवीन ट्वीट करण्याची ‘विनंती’ देखील राम कदम यांनी केली आहे. हा सगळा प्रकार ट्वीटरवरच सुरू असल्यामुळे ट्वीटकरींना मात्र या वादामुळे चांगलाच मसाला मिळाला आहे.

नक्की झालं काय?

या सगळ्या प्रकाराची सुरुवात झाली ती हरभजन सिंगने केलेल्या एका ट्वीट व्हिडिओमुळे. हरभजन सिंगने त्याच्या ट्वीटर हँडलवरून २९ मार्चला एक व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओमधून त्याने भारतातल्या लोकांना पाकिस्तानी माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीच्या समाजसेवी संस्थेला कोरोनाशी लढण्यासाठी देणगी देण्याचं आवाहन केलं आहे. त्यापुढे जाऊन त्याने असंच आवाहन करण्यासाठी शोएब अख्तर, वासिम अक्रम आणि युवराज सिंग या तिघांना नॉमिनेट केलं.

हरभजन सिंगच्या नॉमिनेशननंतर युवराज सिंगने देखील तशाच प्रकारचा व्हिडिओ करून शाहीद आफ्रिदीच्या संस्थेला मदत
करण्याचं आवाहन केलं. त्याहीपुढे जाऊन युवराज सिंगने स्वत:च्या संस्थेला देखील देणगी देण्याचं आवाहन लोकांना करून टाकलं.

या दोघांच्या या ‘पुढाकाराने’ शाहीद आफ्रिदी मात्र भलताच भारावून गेला. त्याने ट्वीट करत या दोघांचे आभार मानले. ‘तुमच्या या पाठिंब्यासाठी तुमचे आभार मित्रांनो. आपल्यातलं हे बॉण्डिंग प्रेम आणि शांतता कोणत्याही सीमांचा विचार न करता मानवतेच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते हेच दाखवतं’, असं शाहीद आफ्रिदीने म्हटलं आहे.

पण शाहीदला आवडलेलं या दोघांचं ट्वीट राम कदम यांना मात्र भलतंच आक्षेपार्ह वाटलं आहे. त्यांनी या दोघांना आपलं ट्वीट मागे घ्यायची विनंती केली आहे. ‘युवराज सिंग आणि हरभजन यांनी केलेलं मदतीचं आवाहन दुर्भाग्यपूर्ण आहे. ही वेळ पाकिस्तानी नागरिकांची मदत करणाऱ्या पाकिस्तानी संस्थेची मदत करण्याचं आवाहन करण्याची नाही. भारतीयांना मदत करण्याचं आवाहन करण्याची आही. याच शाहीद आफ्रिदीने याआधी अनेकदा भारताच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. त्यामुळे या दोघांना माझी विनंती आहे की त्यांनी केलेलं आवाहन मागे घ्यावं आणि पुन्हा भारतीयांसाठी मदत करण्याचं आवाहन करावं’, असं राम कदम म्हणाले आहेत.

कोरोनाच्या ऐन धुमाकुळामध्ये या सेलिब्रिटी मंडळींमध्ये सुरू झालेला वाद नेटि झन्स ‘तेवढंच काहीतरी वेगळं’ असं म्हणून घेतात की गांभीर्याने घेतात, हे मात्र आता पाहावं लागेल!

First Published on: April 1, 2020 1:56 PM
Exit mobile version