Corona Update : धारावीची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; केवळ १६ सक्रिय रुग्ण

Corona Update : धारावीची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; केवळ १६ सक्रिय रुग्ण

कोरोनाविरोधातील 'द धारावी मॉडल'ची मराठी यशोगाथा, महापौर पेडणेकरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

मुंबई महापालिकेने पुन्हा एकदा केलेल्या यशस्वी उपाययोजनांमुळे कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत असून कोरोनाची दुसरी लाट ओसरायला लागली आहे. विशेषतः आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे केवळ २ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्याही घटून १६ वर आली आहे. आता धारावी विभागाची वाटचाल कोरोनामुक्तीच्या दिशेने सुरू आहे. काही दिवसांतच धारावीतील कोरोना रुग्णांचे व सक्रिय रुग्णांचे प्रमाण शून्यावर येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासाठी पालिका आरोग्य यंत्रणा, स्थानिक लोकप्रतिनिधी, मदतगार समाजसेवक, समाजसेवी संस्था आदींसह साहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांचे अथक प्रयत्न कारणीभूत आहेत.

आतापर्यंत ६४८३ रुग्ण बरे 

धारावीत गेल्या २४ तासांत कोरोनाचे केवळ २ रुग्ण आढळून आले आहेत. तर दादर विभागात ९ आणि माहीम विभागात १२ असे एकूण २३ रुग्ण हे या तीन विभागात कोरोनाबाधित म्हणून आढळून आले आहेत, अशी माहिती किरण दिघावकर यांनी दिली. तसेच धारावी विभागात आतापर्यंत ६८५८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ६४८३ रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर विविध रुग्णालयात सक्रिय रुग्णांची संख्या १६ एवढी आहे, असेही त्यांनी सांगितले.

तीन विभागात एकूण ३२९ सक्रिय रुग्ण

त्याचप्रमाणे दादर विभागात आतापर्यंत ९५३८ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ९१९० रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर विविध रुग्णालयांत सक्रिय रुग्णांची संख्या १६४ इतकी आहे. माहीम विभागात आतापर्यंत कोरोनाबाधित ९८६३ रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी ९५१२ रुग्णांना बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. तर विविध रुग्णालयांत सक्रिय रुग्णांची संख्या १४९ इतकी आहे. या तीन विभागातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ३२९ इतकी आहे.

First Published on: June 11, 2021 9:19 PM
Exit mobile version