मुंबईचा भाजीपाला पुरवठा आटणार? एपीएमसी मार्केट शनिवारपासून बंद!

मुंबईचा भाजीपाला पुरवठा आटणार? एपीएमसी मार्केट शनिवारपासून बंद!

एपीएमसी मार्केट

मुंबई शहर आणि उपनगरांना भाजीपाला आणि अन्नधान्याचा पुरवठा करणारे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट शनिवारपासून बंद ठेवण्यात येणार आहे. मसाला मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे बुधवारी उघड झाले. त्यानंतर कांदा-बटाटा, भाजीपाला आणि फळ मार्केटमधील व्यापाऱ्यांनी गुरुवारी एका बैठकीत तिन्ही बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. लॉकडाऊनच्या कालावधीत सुरुवातीला एपीएमसीच्या परिसरात ग्राहकांची मोठी गर्दी झाली. त्यामुळे पोलिसांनी या भागात आता कडक बंदोबस्त ठेवल्याने गर्दीवर नियंत्रण आले आहे.

कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड आणि महापालिका आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी भाजीपाला मार्केटमध्ये दररोज फक्त २०० गाड्यांना परवानगी दिल्यामुळे मार्केटचा व्यवहार सोशल डिस्टंसिंगचे पालन करुन सुरू आहे. मात्र बुधवारी मसाला मार्केटमधील एका व्यापाऱ्याला कोरोना विषाणूची बाधा झाली. कोरोना संसर्ग झालेला सदर व्यापारी हा मुंबईचा रहिवाशी आहे. मुंबईतून त्यांची ये-जा सुरू होती. त्यानंतर आज भाजीपाला, फळ आणि कांदा-बटाटा मार्केटमधील व्यापाऱ्यांच्या बैठका झाल्या. त्यामध्ये कांदा-बटाटा मार्केट, भाजीपाला आणि फळ मार्केट शनिवारपासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे एपीएमसीचे संचालक शंकर पिंगळे आणि संजय पानसरे यांनी सांगितले.

धान्य मार्केट सुरू राहणार!

कांदा-बटाटा आणि भाजीपाला मार्केटच्या तुलनेमध्ये धान्य मार्केटमध्ये ग्राहकांची वर्दळ फार कमी असते. त्यामुळे आम्ही तूर्तास तरी धान्य मार्केट बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आमचे मार्केट नियमित सुरू राहणार आहे. ग्राहकांनी मार्केटमध्ये न येता फक्त फोनवरच ऑर्डर द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली असून तिला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळला आहे, असे धान्य मार्केटचे संचालक निलेश विरा यांनी सांगितले.

First Published on: April 9, 2020 7:41 PM
Exit mobile version