Corona Vaccination : केंद्राकडून लसीचा साठा वेळेत उपलब्ध न झाल्यास मुंबईत लसीकरण बंद!

Corona Vaccination : केंद्राकडून लसीचा साठा वेळेत उपलब्ध न झाल्यास मुंबईत लसीकरण बंद!

कुर्ला भाभा रुग्णालयात लसीचा तुटवडा, नागरिकांचे हाल

केंद्र सरकारने मुंबईकारांसाठी आवश्यक लसीच्या साठ्याचा ओघ सातत्याने सुरू ठेवला तरच मुंबईतील खासगी, शासकीय आणि पालिका लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू राहील. परंतु, हा साठा वेळेत न उपलब्ध झाल्यास लसीकरण केंद्र बंद ठेवावी लागतील, असे मुंबई महापालिका प्रशासनाने कळवले आहे. तसेच लसीच्या साठ्याचा ओघ केंद्र सरकारने सातत्याने सुरू न ठेवल्यास मुंबईतील लसीकरण सेवा बंद पडणार असल्याचा व त्याला केंद्र सरकारच जबाबदार असेल, असा सूचक इशाराही पालिकेने या निमित्ताने दिला आहे.

पालिकेकडे व खासगी लसीकरण केंद्रांवर सध्या लसीचा खूप कमी साठा शिल्लक आहे. २५ एप्रिलपर्यंत एकूण २४ लाख ५८ हजार ६०० इतक्या लसी उपलब्ध झाल्या होत्या. मात्र, त्यापैकी २४ लाख १० हजार ८६० लस उपयोगात आल्या. म्हणजेच ४७ हजार ७४० इतका लससाठा २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजेपर्यंत लसीकरणानंतर संबधित केंद्रांवर शिल्लक होता. लसीकरणाचा वेग लक्षात घेता हा लससाठा उद्या संपूर्ण दिवस पुरणार नाही, असे पालिकेने म्हटले आहे.

उद्या ४० खासगी लसीकरण केंद्र बंद

पुरेसा लससाठा शिल्लक नसल्याने २९ एप्रिलला (उद्या) ४० खासगी लसीकरण केंद्र बंद राहणार आहेत. उर्वरित ३३ खासगी लसीकरण केंद्रांवरही दुसऱ्या मात्रेसाठी मर्यादित साठाच शिल्लक असल्याचे पालिकेने म्हटले आहे. मात्र, गुरुवारी सकाळपूर्वी केंद्र सरकारकडून आवश्यक लसीचा साठा उपलब्ध झाला, तरच गुरुवारी संपूर्ण दिवसभर शासकीय व महापालिका लसीकरण केंद्र सुरु राहतील, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

दरम्यान, बुधवारी रात्री उशिरापर्यंत काही प्रमाणात लससाठा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. हा साठा प्राप्त झाल्यास २९ एप्रिल रोजी मुंबईतील शासकीय तसेच महानगरपालिका रुग्णालयातील केंद्रांवर लसीकरण सुरु राहणार आहे. लससाठ्याचा ओघ वाढल्यानंतर लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु होईल, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

First Published on: April 28, 2021 9:15 PM
Exit mobile version